औरंगाबाद जिल्ह्यात सर्वदूर पाऊस

By Admin | Updated: July 11, 2016 01:21 IST2016-07-11T01:12:23+5:302016-07-11T01:21:18+5:30

औरंगाबाद : शनिवारप्रमाणेच रविवारीही शहरात दमदार पाऊस झाला. सकाळपासून रात्री उशिरापर्यंत अविश्रांतपणे पावसाची रिमझिम सुरू होती.

The entire rain in Aurangabad district | औरंगाबाद जिल्ह्यात सर्वदूर पाऊस

औरंगाबाद जिल्ह्यात सर्वदूर पाऊस

औरंगाबाद : शनिवारप्रमाणेच रविवारीही शहरात दमदार पाऊस झाला. सकाळपासून रात्री उशिरापर्यंत अविश्रांतपणे पावसाची रिमझिम सुरू होती. त्यामुळे सखल भागातील रस्त्यांवर पाणी साचून रस्ते जलमय झाले. शहरात दिवसभर सूर्यदर्शनही झाले नाही. दरम्यान, रविवारची सुटी असल्यामुळे पावसाचा आनंद लुटण्यासाठी तरुणाईने दौलताबाद, म्हैसमाळ, सारोळा या नजीकच्या पर्यटनस्थळांकडे कूच केली.
पावसाने आठवडाभरापासून जिल्ह्यावर कृपादृष्टी केली आहे. सोमवारी, मंगळवारी आणि त्यानंतर काल शनिवारी शहरात दमदार पाऊस झाला. आज सकाळपासून ढगाळ वातावरण होते. सकाळी ११ वाजेच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. थोडीही विश्रांती न घेता हा पाऊस रात्री उशिरापर्यंत सुरू होता. जायकवाडीच्या पाणीपातळीत किंचित वाढ झाली. भूगर्भातील पाणीपातळी चांगलीच वाढली. त्यामुळे औरंगपुरा, बालाजीनगर, उत्तमनगर, विष्णूनगर, नूर कॉलनी, जयभवानीनगर, पुंडलिकनगर, स्वप्ननगरी, तिरुपती पार्क, उल्कानगरी आदी भागांतील रस्त्यांवर ठिकठिकाणी पाणी साचले. शहरातील नाले दिवसभर दुथडी भरून वाहत होते. रेल्वेस्टेशन, हर्सूल, मध्यवर्ती बसस्थानकाजवळील (पान २ वर)
शहरात सर्वाधिक पाऊस चिकलठाणा मंडळांतर्गत पडला. १० जुलैच्या सकाळी ८.३० वाजेपर्यंत चिकलठाणा मंडळात सर्वाधिक पावसाची नोंद झाली असून, दुपारनंतर सुरू झालेल्या पावसाने संपूर्ण शहर गारठून टाकले.
उस्मानपुरा, चित्तेपिंपळगाव, कांचनवाडी या मंडळांतर्गतदेखील दमदार पाऊस झाला. औरंगाबाद शहर मंडळांतर्गत २६ मि. मी. पावसाची नोंद झाली. शहर व परिसरात पावसामुळे रस्त्यांवर पाणी साचले होते.
९ कोटींचा जालना रोड गेला वाहून
औरंगाबाद : जालना रोडवर ९ कोटी रुपये खर्चातून करण्यात आलेले डांबरी सरफेसिंग शनिवारी आणि रविवारी झालेल्या पावसामुळे वाहून गेले आहे. गेल्या आठवड्यातील पावसामुळे सरफेसिंग उखडले होते. रविवारी दिवसभर पाऊस सुरू असल्यामुळे डांबर वाहून गेल्यामुळे रस्त्यावर खड्डे पडले.
शहरातील रस्त्यांबाबत नागरिकांत आक्रोश, राग, संताप कायम आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग असो किंवा महापालिका, रस्ते चांगले असावेत हीच नागरिकांची अपेक्षा आहे. पाऊस झाल्यामुळे शहरातील बहुतांश रस्ते खड्डेयुक्त झाले आहेत. त्या रस्त्यांमुळे नागरिकांचे हाल होत आहेत. शहरातील १३५० कि़ मी. रस्ते महापालिकेचे आहेत. त्यामध्ये १२५ कि़मी.चे रस्ते विकास आराखड्यातील आहेत आणि २० कि़मी.चे रस्ते सार्वजनिक बांधकाम खात्याचे आहेत.
३ वर्षांची जबाबदारी
नगरनाका ते विमानतळ (बाबा पेट्रोलपंप ते क्रांतीचौक वगळून) ९ कि़मी., सिडको ते हर्सूल टी पॉइंट ५ कि़मी. व हर्सूल ते दिल्लीगेटपर्यंत २.५ कि़ मी. पंचवटी चौक ते छावणी लोखंडी पूल अर्धा कि़मी. व नगरनाका ते गोलवाडीपर्यंत २.५ कि़ मी. पर्यंतच्या रस्त्याचे मजबुतीकरण २१ कोटींच्या निधीतून जून २०१४ मध्ये झाले होते.
यातील जालना रोड हा सर्वात जास्त निधी मिळालेला रस्ता होता. ९ कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला होता.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत असलेल्या शहरातील २० कि़ मी. रस्त्यांसाठी २०१३ मध्ये २१ कोटी रुपयांचा निधी मिळाला होता.
सर्वच तालुक्यांत संततधार
शहरासह जिल्ह्यात रविवारी पावसाने हजेरी लावली. शहरात दिवसभर संततधार पाऊस सुरू होता. वैजापूर, कन्नड, खुलताबाद यांसह सर्व तालुक्यांमध्ये पाऊस सुरू होता.
कन्नड तालुक्यात जोरदार पाऊस
कन्नड शहर व तालुक्यात रविवारी दुपारी १२ वाजेपासून दमदार पावसाला सुरुवात झाली. यामुळे धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या अंबाडी मध्यम प्रकल्पातील जलसाठ्यात पाण्याची भर पडली. चिकलठाण येथील गांधारी नदी दुथडी भरून वाहत आहे.
वैजापुरात दिवसभर रिमझिम
वैजापूर शहरासह तालुक्यात रविवारी दुपारपासून रिमझिम पावसाच्या सरी बरसल्या. तालुक्यात सायंकाळी ६ नंतर दमदार पावसाने हजेरी लावली.
खुलताबादमध्ये दमदार पाऊस
खुलताबाद तालुक्यात दमदार स्वरूपाचा पाऊस झाल्याने नदी-नाले ओसांडून वाहू लागले.

Web Title: The entire rain in Aurangabad district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.