भाजपात उत्साह तर शिवसेनेत तीव्र नाराजी

By Admin | Updated: November 14, 2014 00:53 IST2014-11-14T00:28:32+5:302014-11-14T00:53:07+5:30

जालना : सत्तापरिवर्तनात वाटा न मिळाल्याने या जिल्ह्यातील शिवसेना कार्यकर्त्यांत प्रचंड निरुत्साह तर सत्तेत प्रतिनिधित्व मिळणार असल्याने भाजपात प्रचंड उत्साह संचारला आहे.

The enthusiasm in the BJP and the Shiv Sena's deep resentment | भाजपात उत्साह तर शिवसेनेत तीव्र नाराजी

भाजपात उत्साह तर शिवसेनेत तीव्र नाराजी


जालना : सत्तापरिवर्तनात वाटा न मिळाल्याने या जिल्ह्यातील शिवसेना कार्यकर्त्यांत प्रचंड निरुत्साह तर सत्तेत प्रतिनिधित्व मिळणार असल्याने भाजपात प्रचंड उत्साह संचारला आहे.
राज्याप्रमाणे या जिल्ह्यानेही १५ वर्षे काँग्रेसजनांची राजवट अनुभवली. या पार्श्वभूमीवरच विधानसभा निवडणुकीत राज्यात सत्तापरिवर्तन घडले. त्यामुळे भारतीय जनता पक्षाप्रमाणे शिवसेनेच्याही पुढाऱ्यांसह सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या भुवया उंचावल्या. लगेच अपेक्षाही उंचावल्या.
२५ वर्षांपासून एकत्रितपणे निवडणुका लढविलेल्या या दोन्ही पक्षांच्या पुढाऱ्यांसह कार्यकर्त्यांना यावेळी स्वतंत्रपणे निवडणूक लढविणे सर्वार्थाने अक्षरश: जड गेले. परंतु ऐनवेळी युती फिस्कटल्यानंतर स्वत:स कसबसे सावरत पुढाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी परिवर्तनाच्या लाटेत स्वार होण्याचे सर्वार्थाने प्रयत्न केले. त्यात भाजपाला मोठे यश मिळाले. तर काठावर विजयीश्री खेचून शिवसेनेने प्रतिष्ठा राखली. या पार्श्वभूमीवरच निवडणुकीनंतरच का असेना एकेकाळच्या दोन्ही मित्रपक्षांत मनोमिलन व्हावे व सत्तेत वाटा मिळावा, असा सूर प्रकटला.
त्यामुळेच गेल्या पंधरा दिवसांपासून राज्यातील राजकीय घडामोडींवर या जिल्ह्यातील राजकीय क्षेत्रातील कार्यकर्त्यांचे लक्ष होते. विशेषत: भाजपाप्रमाणे शिवसेनेचे कार्यकर्ते बारीक लक्ष ठेवून होते. केंद्रिय मंत्रिमंडळात या जिल्ह्यास प्रतिनिधित्व मिळाल्यामुळेच सुखावलेल्या भाजपाच्या कार्यकर्त्यांना राज्य मंत्रिमंडळात सुद्धा प्रतिनिधित्व मिळेल, याची खात्री निर्माण झाली आहे.
जिल्हाध्यक्ष तथा आमदार बबनराव लोणीकर यांची मंत्रिमंडळात वर्णी लागेल म्हणून समर्थकांसह कार्यकर्ते मोठ्या आत्मविश्वासात वावरत आहेत. त्याप्रमाणे शिवसेनेचे कार्यकर्ते सुद्धा भाजपा-शिवसेनेत तडजोड होईल, सत्तेत वाटा मिळेल या अपेक्षेत होते. माजीमंत्री अर्जुन खोतकर यांच्या रूपाने जिल्ह्यास कॅबिनेट दर्जाचे मंत्रिपद मिळेलच, अशी आशा बाळगून होते. परंतु गेल्या दोन दिवसांत राज्यातील नाट्यमय घडामोडीनंतर शिवसेनेचे स्थानिक कार्यकर्ते कमालीचे अस्वस्थ झाले आहेत.
विशेषत: या जिल्ह्यातील पाचपैकी तीन विधानसभा मतदारसंघातून भाजपाचा झेंडा फडकला आहे. त्यातच राज्य मंत्रिमंडळात या जिल्ह्याला प्रतिनिधित्व मिळेल, अशी चिन्हे आहेत. त्यामुळेच भाजपाच्या प्राबल्यामुळे अस्वस्थता आणखी वाढली आहे. काहींनी विरोधी पक्षात बसण्याच्या भूमिकेचे स्वागत केले खरे. परंतु बहुतांशी स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सत्तेत वाटा मिळायला हवा होता, असे वाटत होते. ( जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: The enthusiasm in the BJP and the Shiv Sena's deep resentment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.