कार्यपूर्तीचा आनंद
By Admin | Updated: August 11, 2014 01:55 IST2014-08-11T01:30:40+5:302014-08-11T01:55:52+5:30
औरंगाबाद : एखादी मागणी होणे, ती समजावून घेणे, ती पूर्ण करणे व त्यानुसार अंमलबजावणी करण्यात एक वेगळाच आनंद आहे, असे उद्गार राज्याचे शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी शनिवारी (दि.९) काढले.

कार्यपूर्तीचा आनंद
औरंगाबाद : एखादी मागणी होणे, ती समजावून घेणे, ती पूर्ण करणे व त्यानुसार अंमलबजावणी करण्यात एक वेगळाच आनंद आहे, असे उद्गार राज्याचे शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी शनिवारी (दि.९) काढले.
टंकलेखन व लघुलेखनाच्या राज्यातील वाणिज्य शिक्षण संस्थांमध्ये संगणक टायपिंग प्रशिक्षण सुरू करण्यास राज्य सरकारने नुकतीच परवानगी दिली असून त्यानुसार दोन संस्थांना प्रतिनिधिक स्वरूपात प्रत्यक्ष परवाने प्रदान करण्याचा सोहळा राजेंद्र दर्डा यांच्या हस्ते शहरात संपन्न झाला. राज्यातील वाणिज्य शिक्षण संस्थेचे प्रदेशाध्यक्ष लालचंद चांदीवाल अध्यक्षस्थानी होते.
आ. विक्रम काळे, शिक्षण संचालक अनिल भानप, संघटनेचे नेते प्रकाश कराळे, शिक्षण उपसंचालक सुधाकर बनाटे, उपायुक्त भाऊसाहेब सोनवणे, माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी भगवान सोनवणे, बोर्डाचे सदस्य किरण पाटील आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
आ. विक्रम काळे म्हणाले, अगदी कमी वेळात शिक्षणमंत्र्यांनी ही मागणी पूर्ण केली व त्याची अंमलबजावणीही विक्र मी वेळेत होते आहे. काम करणारे कोण आहेत हे तुम्ही ओळखा, असे ते म्हणताच सभागृहात राजेंद्र बाबू दर्डा यांच्या नावाची जोरदार घोषणाबाजी झाली.
शिक्षण संस्थेतर्फे राजेंद्र दर्डा यांचा यानिमित्त भव्य सत्कार करण्यात आला. चांदीवाल यांनी अध्यक्षीय समारोप केला.
सरदारसिंह बैनाडे यांनी सूत्रसंचालन केले, तर दिलीप कुलकर्णी यांनी आभार मानले. राजेंद्र वाणी, शेवाळे, मोहन भूमे, संतोष दाणे आदींनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.
राजेंद्र दर्डा म्हणाले, टायपिंग मशीन कालबाह्य झाल्या. त्यांचे सुटे भागही आता मिळत नाहीत. शिवाय सर्व खासगी, शासकीय कार्यालयांतून ई-वर्किंग सुरू झाले. त्यामुळे संगणकाचे शास्त्रीय शिक्षण देणाऱ्या संस्थांची गरज होतीच.
मागील अनेक वर्षांपासून टंकलेखन व लघुलेखन शिकवणाऱ्या संस्था कार्यरत आहेत व त्यांची ही मागणी होती. या संस्थांना मदत करणेही गरजेचे होते. लोकोपयोगी निर्णय घेणे हे सरकारचे काम असते, त्यानुसार निर्णय घेतला व त्याची अंमलबजावणी होत आहे, याचा मला विशेष आनंद आहे. यासाठी तयार करण्यात आलेला अभ्यासक्रमही सुंदर असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.