पालकांच्या चुकांमुळे हिरावला जीवनाचा आनंद..!
By Admin | Updated: November 14, 2014 00:53 IST2014-11-14T00:37:22+5:302014-11-14T00:53:48+5:30
कळंब : ‘‘ऊसवलं गणगोत सारं आधार कुणाचा न्हाई, भेगाळल्या भुईपरी जीनं अंगार जिवाला जाळी’’ या गुरू ठाकूरांच्या गितातील शब्दांतील

पालकांच्या चुकांमुळे हिरावला जीवनाचा आनंद..!
कळंब : ‘‘ऊसवलं गणगोत सारं
आधार कुणाचा न्हाई,
भेगाळल्या भुईपरी जीनं
अंगार जिवाला जाळी’’
या गुरू ठाकूरांच्या गितातील शब्दांतील वास्तविकता कळंब येथील सहारा एचआयव्हीग्रस्त मुलांच्या बालगृहातील निरागस बालकांच्या कहाणीवरून दिसून येते़ पालकांच्या चुकांमुळे बालपणीचे अपेक्षित सुख या बालकांकडून हिरावल्याचे दिसत असून, बालवयापासूनच अनाहूत ‘भोग’ भोगण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे़ ही संस्था बालकांच्या जीवनात आनंद देण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करीत असली तरी बालपणाचा खरा आनंद त्यांच्या जीवनातून कधीच निघून गेल्याचे बालकांच्या निरागस चेहऱ्याकडे पाहिल्यानंतर दिसून येते़
आपल्या जन्मभूमीत बालपणीच्या सवंगड्यासोबत बागडावे, शिक्षणाचे धडे गिरवावेत़़ कुटुंबातील सदस्यांच्या मायेच्या पदाखाली सतत रहावे, असे कोणत्या बालकास वाटत नसेल ! बालपणीचा काळ या सुखाचा मानकरीच मानला जातो़ परंतु काहींना मात्र, या सुखापासून दुरावण्याची वेळ आली आहे़ कळंब येथे तुळजाई प्रतिष्ठान संचलित सहारा एचआयव्हीग्रस्त बालकांचे बालगृह २००८ पासून चालविले जात आहे़ या बालगृहात सध्या ४७ एचआयव्हीग्रस्त बालकांचा संभाळ करण्यात येत आहे़ विविध भागातून आलेल्या या बालकांचे वर्तमान आणि भविष्यकाळही एका अर्थाने मोठ्या संघर्षाचेच आहे़ पालकांच्या चुकांची शिक्षा भोगणाऱ्या बालकांचे घरपण दुरावले असून, बालपण बालगृहात घालवावे लागत आहे़ असे असले तरी ही संस्था अडचणींचा सामना करीत बालकांचे जीवन फुलविण्यासाठी प्रयत्न करीत आहे़ सामाजिक मदतीचा हात असला तरी तो ओघ वाढण्याची गरज व्यक्त होत आहे़ त्यामुळेच गुरू ठाकूर यांच्या
‘‘बळ दे झुंजायाला
किरपेची ढाल दे
करपलं रान देवा,
जळलं शिवार
तरी न्हाई धीर सांडला़़
खेळ मांडला़़ खेळ मांडला़़’’ अशी स्थिती येथील बालकांची आहे़
उपेक्षितांना मायेचा आधार
येथील बालगृहातील चिमुरड्यांना व्यक्तीगत आयुष्याचा लेखाजोखा घेण्याचा प्रयत्न केला तर अनेक दु:खदायक कथा समोर येतात़ कोणाला आई नाही़ कोणाला वडल नाही़़ तर काहींना आई-वडिलांचीही माहिती नाही़ अशा या आई-वडिलांचे छत्र हरविलेल्या उपेक्षितांना सहारा बालगृह मायेचा आधार देत आहे़४
बालपण हरवलेल्या मुलांच्या चेहऱ्यावर हस्य निर्माण करण्यासाठी आणि लागणाऱ्या विविध साहित्याचा पुरवठा करण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनीही पुढाकार घेतला आहे़ सण, उत्सव अथवा कौटुंबिक कार्यक्रम असला तरी अनेकजण सढळ हाताने येथील मुलांना मदत करतात़ रोटरीचेही प्रयत्न चांगले आहेत़ शिवाय इटकूर येथील प्रभाकर आडसूळ यांनी एका मुलीचे पालकत्त्व स्विकारले आहे़