अभियांत्रिकीचे निकाल रखडले
By Admin | Updated: July 13, 2017 01:04 IST2017-07-13T00:53:25+5:302017-07-13T01:04:33+5:30
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने घेतलेल्या अभियांत्रिकीच्या पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या परीक्षांचे निकाल रखडले आहेत

अभियांत्रिकीचे निकाल रखडले
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने घेतलेल्या अभियांत्रिकीच्या पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या परीक्षांचे निकाल रखडले आहेत. परीक्षा संपल्या त्यास तब्बल ५० दिवसांपेक्षा अधिक कालावधी लोटला असून, आणखी काही दिवस निकालाची वाट पाहावी लागण्याची शक्यता आहे. मात्र या विलंबामुळे मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या शेवटच्या सत्राची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना ‘एमपीएससी’च्या मुख्य परीक्षेची संधी हुकणार असल्याचे स्पष्ट होत आहे.
विद्यापीठातर्फे अभियांत्रिकीच्या परीक्षा सुरू असतानाच चौका येथील साई इन्स्टिट्यूट आॅफ इंजिनिअरिंग अॅण्ड टेक्नॉलॉजी महाविद्यालयातील गैरप्रकाराचा कारनामा १७ मे रोजी उघडकीस आला होता. तेव्हापासून अभियांत्रिकी विभाग चर्चेत आहे. या गैरप्रकारानंतर तरी अभियांत्रिकीच्या परीक्षा आणि मूल्यमापनात महत्त्वाचे बदल होण्याची अपेक्षा व्यक्त होत होती. मात्र ही अपेक्षा फोल ठरली आहे.
अभियांत्रिकीच्या परीक्षा संपल्या त्यास ५० दिवसांपेक्षा अधिक कालावधी लोटला आहे. तरी अद्यापही निकाल लागलेले नाहीत. हे निकाल लवकर लागण्याची शक्यता नसल्याचे परीक्षा विभागातील सूत्रांनी सांगितले. या रखडलेल्या निकालाचा परिणाम अभियांत्रिकीच्या शेवटच्या सत्राची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांवर झाला आहे.
अनेकांना पदव्युत्तर शिक्षणाला प्रवेश घेण्यात अडचणी येत आहेत. तर काहींची निवड नामांकित कंपन्यांत झालेली असताना निकाल नसल्यामुळे जॉइन होता येत नाही. यात विद्यार्थ्यांचे नुकसान होत असून, कुलगुरूं चे दुर्लक्ष असल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे.