अभियंता, ग्रामसेवकांचा बहिष्कार
By Admin | Updated: July 6, 2015 00:19 IST2015-07-05T23:53:56+5:302015-07-06T00:19:13+5:30
लातूर : अभियंत्यांबरोबर आता जिल्हा परिषदेच्या ग्रामसेवकांनीही महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या कामावर बहिष्कार टाकला आहे

अभियंता, ग्रामसेवकांचा बहिष्कार
लातूर : अभियंत्यांबरोबर आता जिल्हा परिषदेच्या ग्रामसेवकांनीही महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या कामावर बहिष्कार टाकला आहे. त्यामुळे रोहयोची कामे खोळंबली आहेत. मागील दोन महिन्यांपासून बहिष्कार असल्याने रोहयोच्या कामांवर हा परिणाम झाला आहे.
जिल्हा परिषदेच्या अभियंता संघटनेने कोल्हापूर येथे बैठक घेऊन जिल्हा परिषदेच्या शाखा, कनिष्ठ अभियंत्यांना रोजगार हमी योजनेचे अतिरिक्त काम देण्यात येते़ शाखा, कनिष्ठ अभियंत्यांना जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागांतर्गत तसेच जिल्हा परिषद लघुपाटबंधारे विभागांतर्गत दैनंदीन कामकाज करावे लागते़ या कामाचाच प्रचंड ताण असतानाच जिल्हा परिषदेअंतर्गत चालवल्या जाणाऱ्या महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत सिंचन विहिरी, कम्पार्टमेंट बंडिंग, रस्ते, शौचालय, सिंचन विहिरी आदी कामांची पाहणी करणे तसेच त्यांचे दस्तऐवज तयार करणे अशा कामाच्या अतिरिक्त जबाबदाऱ्या दिल्या जातात़ त्यामुळे आहेत ते कामेही सुरळीत होत नाहीत़ तसेच अतिरिक्त कामाच्या ताणामुळे त्यांचे मानसिक, शारीरिक खच्चीकरण होत आहे़ हा ताण कमी करण्यासाठी पर्यायी उपाययोजना असतानाही तिचा उपयोग केला जात नसल्याचा आरोप अभियंत्यांनी केला आहे. बहिष्कारामुळे रोजगार हमीची कामे खोळंबली असून, जि.प. कर्मचाऱ्यांवरही ताण आहे. (प्रतिनिधी)
रोजगार हमी योजनेच्या कामांवर जिल्हा परिषद अभियंता संघटनेचा बहिष्कार चालू असतानाच महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनच्या वतीनेही बहिष्कार टाकण्यात आला आहे़ महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीकरिता स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित करण्याची मागणी गेल्या तीन वर्षापासून करण्यात येत आहे़ या मागणीवर शासनाकडून योग्य ती भूमिका घेण्यात आली नाही़ ग्रामसेवक संवर्गाकडे सद्य:स्थितीत ७९ विविध कामे, योजना, अभियान, निवडणूक विभागाची, महसूल विभागाची विविध अतिरिक्त कामे आहेत़ त्यातच गटविकास अधिकाऱ्यांची कामकाजाची पद्धत पारदशी नाही. त्यामुळे बहिष्कार असल्याचे ग्रामसेवक युनियनचे म्हणणे आहे.