हिमायतबाग चौकातील अतिक्रमणे जमीनदोस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2021 04:02 IST2021-02-28T04:02:17+5:302021-02-28T04:02:17+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क औरंगाबाद : शहरात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने पसरत असताना नागरिक अजिबात काळजी घ्यायला तयार नाहीत. याची प्रचिती ...

Encroachments at Himayatbagh Chowk | हिमायतबाग चौकातील अतिक्रमणे जमीनदोस्त

हिमायतबाग चौकातील अतिक्रमणे जमीनदोस्त

लोकमत न्यूज नेटवर्क

औरंगाबाद : शहरात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने पसरत असताना नागरिक अजिबात काळजी घ्यायला तयार नाहीत. याची प्रचिती दस्तुरखुद्द शुक्रवारी रात्री महापालिका प्रशासक आस्तिककुमार पांडे यांना हिमायत बाग चौकात आली. या चौकातील चायनीज, चहा विक्रेते आणि हॉटेलवर विनामास्क मोठी गर्दी पाहायला मिळाली. त्यामुळे शनिवारी सकाळी या भागातील तीन लोखंडी टपऱ्या, पाच शेड अतिक्रमण हटाव विभागाने जमीनदोस्त केल्या. तसेच यावेळी मास्क न लावलेल्या नागरिकांवरही कारवाई करण्यात आली.

प्रशासनाने गेल्या काही दिवसांपासून रात्रीची संचारबंदी सुरू केली आहे. या संचारबंदीचा फारसा फायदा आतापर्यंत दिसून आलेला नाही. सर्वसामान्य गोरगरीब आणि हातावर पोट असलेले नागरिक लॉकडाऊनमध्ये भरडले जातील, अशी भीती प्रशासनाला वाटत आहे. मात्र, शहरात अजूनही नागरिक स्वतःला शिस्त लावून घेण्यास तयार नाहीत. शुक्रवारी रात्री महापालिका प्रशासक हिमायत बाग चौकापर्यंत पायी फिरायला निघाले असता, चौकातील दृश्य पाहून त्यांना धक्का बसला. या भागातील छोट्या-मोठ्या व्यावसायिकांनी ग्राहकांची गर्दी जमवून ठेवली होती. आयुक्तांच्या आदेशानुसार शनिवारी सकाळीच महापालिकेचे अतिक्रमण हटाव पथक हिमायत बाग चौकात पोहोचले. सोबत नागरिक, मित्र पथकाचे कंत्राटी कर्मचारी होते. अतिक्रमण हटाव विभागाने रस्त्यावरील तीन लोखंडी टपऱ्या, पाच शेड जमीनदोस्त केल्या. यावेळी मास्क न घातलेल्या दहापेक्षा अधिक नागरिकांवर कारवाई केली. ही कारवाई अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पदनिर्देशित अधिकारी सविता सोनवणे, इमारत निरीक्षक सय्यद जमशीद, मजहर अली, पी. बी. गवळी यांनी केली.

Web Title: Encroachments at Himayatbagh Chowk