अतिक्रमण पथकाशी वाद
By Admin | Updated: June 10, 2016 23:45 IST2016-06-10T23:43:41+5:302016-06-10T23:45:09+5:30
परभणी : शहरातील गंगापुत्र कॉलनी ते आझम कॉलनी रस्त्याच्या उजव्या बाजूला नाल्यावरील अतिक्रमणे शुक्रवारी मनपा पथकाच्या वतीने काढण्यात आली.

अतिक्रमण पथकाशी वाद
परभणी : शहरातील गंगापुत्र कॉलनी ते आझम कॉलनी रस्त्याच्या उजव्या बाजूला नाल्यावरील अतिक्रमणे शुक्रवारी मनपा पथकाच्या वतीने काढण्यात आली. या मोहिमेदरम्यान सायंकाळी ५ वाजता काही जणांनी पथकाशी किरकोळ कारणावरुन वाद घातला. यानंतर मनपाने घटनास्थळी पोलिस बंदोबस्त मागविला होता.
मागील काही दिवसांपासून शहरातील विविध भागात मोहीम राबविली जात आहे. १० जून रोजी सकाळी दर्गा रस्त्यावरील गंगापुत्र कॉलनी येथून नाल्यावरील अतिक्रमण, ओटे काढण्यास सुरुवात झाली. रस्त्याच्या उजव्या बाजूला असलेली सर्व अतिक्रमणे जेसीबीच्या सहाय्याने काढण्यात आली. स्वच्छता निरीक्षक सुनील वसमतकर यांच्या पथकाने सर्व अतिक्रमणे काढली. जेसीबी व टिप्परच्या सहाय्याने १५ कर्मचाऱ्यांचा मोहिमेत सहभाग होता. दरम्यान, शुक्रवारी दुपारी ४.३० च्या सुमारास एका चौकात पथकासोबत काही जणांनी वाद घातला. यानंतर कोतवाली व नानलपेठ पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षकांसह अन्य कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. यामध्ये नानलपेठ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रौफ, बोके, सहाय्यक पोलिस निरीक्षक सुजाता शानमे यांनी घटनास्थळी भेट देऊन जमावाला शांत करीत मोहीम सुरु ठेवली. यामुळे परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. तसेच जुना मोंढा भागात स्वच्छता निरीक्षक के. बी. हैबते यांच्या पथकाने जेसीबीच्या सहाय्याने अतिक्रमणे काढली. (प्रतिनिधी)