भूखंडावर अतिक्रमण; वकिलास शिक्षा
By Admin | Updated: October 1, 2014 00:55 IST2014-10-01T00:55:45+5:302014-10-01T00:55:45+5:30
बीड : भूखंडावर अतिक्रमण करणे केज येथील एका वकिलाला चांगलेच महागात पडले. उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या भूखंडावर अतिक्रमण केल्यावरुन शनिवारी वकिलाला न्यायालयाने

भूखंडावर अतिक्रमण; वकिलास शिक्षा
बीड : भूखंडावर अतिक्रमण करणे केज येथील एका वकिलाला चांगलेच महागात पडले. उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या भूखंडावर अतिक्रमण केल्यावरुन शनिवारी वकिलाला न्यायालयाने महिन्याच्या साध्या कैदेची शिक्षा सुनावत चांगलाच दणका दिला. कायद्यापुढे सारे समान असतात याचा प्रत्यय यानिमित्ताने आला़
झाले असे, केज येथील जिल्हा परिषद हायस्कूलसमोर महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी एन. ए. इनामदार यांचा ४० बाय ६५ इतका प्लॉट आहे. त्यांनी येथे घर बांधले़ केज येथीलच अॅड. उस्मान सरवर पटेल यांनी इनामदार यांच्या प्लॉटला चिकटून ५० बाय ५० चा प्लॉट असल्याचा दावा केला. पटेल यांच्या रजिस्ट्रीच्या कागदपत्रांवर केवळ तीन सीमांचा उल्लेख आहे़ त्यांनी प्लॉटवर बांधकाम करताना इनामदार यांच्या रिकाम्या जागेवरही अतिक्रमण केले. इनामदार यांनी पटेल यांच्या बांधकामावर आक्षेप नोंदवत अंबाजोगाई येथील न्यायालयात धाव घेतली़ ३१ जुलै २०१२ मध्ये न्यायालयाने ‘जैसे थे’चे आदेश दिले. मात्र, या आदेशानंतरही अॅड. पटेल यांनी बांधकाम सुरुच ठेवले. इनामदार यांनी न्यायालयात अवमान याचिका दाखल केली़ त्यानंतर न्यायालयाने नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांकडून अहवाल मागविला. शिवाय वादी, प्रतिवादीकंडून सबळ पुरावे मागवून घेतले. इनामदार यांनी आपल्या भूखंडाचे दस्ताऐवज व अॅड. पटेल यांनी केलेल्या अतिक्रमणाची छायाचित्रे न्यायालयापुढे ठेवली. न्या. पी. एम. मोरे यांनी परिस्थितीजन्य पुरावे तपासून अॅड. उस्मान पटेल यांना एक महिन्याच्या साध्या कैदेची शिक्षा सुनावली. या निर्णयाने कायद्यावरील विश्वास वाढल्याचे इनामदार यांनी सांगितले़ (प्रतिनिधी)