अतिक्रमण हटाव मोहीम फसली
By Admin | Updated: June 2, 2015 00:23 IST2015-06-02T00:23:47+5:302015-06-02T00:23:47+5:30
वाळूज महानगर : जागतिक बँक प्रकल्प व वाहतूक शाखेच्या वतीने मोठा गाजावाजा करून पंढरपुरात राबविण्यात आलेली अतिक्रमण हटाव मोहीम फसल्याचे दिसत आहे

अतिक्रमण हटाव मोहीम फसली
वाळूज महानगर : जागतिक बँक प्रकल्प व वाहतूक शाखेच्या वतीने मोठा गाजावाजा करून पंढरपुरात राबविण्यात आलेली अतिक्रमण हटाव मोहीम फसल्याचे दिसत आहे. पाडापाडीनंतर दोन दिवसांतच व्यावसायिकांनी पुन्हा अतिक्रमण करून वाहतुकीला खोळंबा करण्यास सुरुवात केली आहे.
औरंगाबाद- अहमदनगर या महामार्गावर पंढरपूर, साऊथ सिटी, वाळूज, लिंबेजळगाव, दहेगाव बंगला, ढोरेगाव आदी ठिकाणी विविध छोट्या-मोठ्या व्यावसायिकांनी रस्त्याच्या दुतर्फा अतिक्रमणे केली होती. या महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी पाच-सहा वर्षांपूर्वी जागतिक बँक प्रकल्पाच्या वतीने अतिक्रमण हटाव मोहीम राबवून फुटपाथ व रस्त्यांवरील अतिक्रमणे हटविण्यात आली होती. चौपदरीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर व्यावसायिकांनी पुन्हा अतिक्रमण केल्यामुळे या महामार्गाचा श्वास कोंडला होता. सतत वाहतुकीची कोंडी होत असे. शिवाय छोटे-मोठे अपघातही घडत होते. या मुख्य महामार्गावर अतिक्रमण होऊ नये, यासाठी प्रशासनातर्फे फुटपाथावर लोखंडी पाईप बसविण्यात आले होते. मात्र, दुकानावर येणाऱ्या ग्राहकांसाठी ते आडसर ठरत असल्यामुळे अनेक व्यावसायिकांनी आपापल्या दुकानांसमोरील लोखंडी पाईप तोडून फुटपाथावरच कब्जा केला होता. या रस्त्यावर साऊथ सिटीपासून ढोरेगावपर्यंत अनेक व्यावसायिकांनी दुकानासमोर व्यवसाय करणाऱ्या छोट्या व्यावसायिकांकडून भाडे उकळण्याचा फंडा अवलंबिला होता. या वाढत्या अतिक्रमणामुळे चौपदरी झालेल्या या महामार्गाची अवस्था दुपरीसारखी झाली होती. गावालगतच मोठ्या प्रमाणात रस्त्यावर अतिक्रमणे झाल्यामुळे वाहनधारकांना ये-जा करताना तारेवरची कसरत करावी लागत होती. अतिक्रमणाचा विळखा वाढल्यामुळे या महामार्गावर अपघातांचे प्रमाणही गत पाच वर्षांत मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे वाहनधारक व पादचाऱ्यांना जीव मुठीत घेऊनच या महामार्गावरून प्रवास करावा लागत आहे.
वाढते अपघात व सतत वाहतुकीची कोंडी होत असल्यामुळे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी शहराबरोबरच मुख्य रस्त्यांवरील अतिक्रमणे हटविण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या होत्या. त्यानंतर जागतिक बँक प्रकल्प, के. टी. कन्स्ट्रक्शन व वाहतूक शाखेच्या वतीने पंधरा दिवसांपूर्वी पंढरपुरात अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली होती. या मोहिमेंतर्गत पोलीस बंदोबस्तात पंढरपुरातील तिरंगा चौक, भाजीमंडई, मच्छी मार्केट, जामा मशीद, विठ्ठल- रुख्मिणी मंदिर व कामगार चौकापर्यंतची अतिक्रमणे जेसीबीच्या मदतीने हटविण्यात आली होती.