पन्नालालनगरमध्ये वळविला नाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2017 00:54 IST2017-09-17T00:54:03+5:302017-09-17T00:54:03+5:30
पन्नालालनगर येथे एका बिल्डरने नाल्याचा प्रवाहच बदलला आहे.

पन्नालालनगरमध्ये वळविला नाला
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : भूमाफियांनी नाला बळकावून त्यावर टोलेजंग इमारत बांधली तरी महापालिका या विरोधात ‘ब्र’अक्षरही काढत नाही. महापालिकेच्या या संयमी भूमिकेमुळे शहरातील असंख्य नाल्यांवर मोठ-मोठ्या इमारती दिमाखात उभ्या आहेत. शहरात मोठा पाऊस झाल्यास नाल्यातील पाण्याला नैसर्गिक प्रवाह मिळत नाही. नाल्यातील अतिक्रमणे काढण्याचा मुद्दा महापालिकेत गाजत असतानाच पन्नालालनगर येथे एका बिल्डरने नाल्याचा प्रवाहच बदलला आहे. या स्तुत्य उपक्रमाला महापालिकेच्या भूमिगत गटार योजनेचे कंत्राटदारही मदत करीत असल्याचे समोर आले आहे.
क्रांतीचौक वॉर्डाच्या नगरसेविका शिल्पाराणी वाडकर यांनी शनिवारी मनपा आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पन्नालालनगर येथे वीज कंपनीच्या कार्यालयासमोरील जागेसंदर्भात वकील व इतर मंडळींचा वाद सुरू आहे. या वादासंदर्भात अंतिम निर्णय झाला नाही. एका बांधकाम व्यावसायिकाने वादग्रस्त जागेवर बांधकाम सुरू केले आहे. या जागेतून जाणाºया नाल्याचा नैसर्गिक प्रवाहच बदलण्यात आला आहे. नाल्याचा नैसर्गिक प्रवाह बदलण्यासाठी भूमिगत गटार योजनेचे कंत्राटदार मदत करीत आहेत. कंत्राटदार या भागात अत्यंत छोटे पाईप टाकत आहेत. मोठा पाऊस झाल्यास नाल्याचे पाणी घरांमध्ये घुसण्याची शक्यता आहे, असे वाडकर यांनी म्हटले आहे.