अपक्षांचीही ताकद पणाला...

By Admin | Updated: October 3, 2014 00:31 IST2014-10-03T00:18:34+5:302014-10-03T00:31:47+5:30

गजेंद्र देशमुख , जालना या जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीतही मोठ्या प्रमाणावर अपक्ष उमेदवार रिंगणात उतरले आहेत. परंतु, हे अपक्ष उमेदवार मतदारांवर मोठा प्रभाव टाकतील, असे चिन्हे नसली तरी,

Empowering the Independent ... | अपक्षांचीही ताकद पणाला...

अपक्षांचीही ताकद पणाला...


गजेंद्र देशमुख , जालना
या जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीतही मोठ्या प्रमाणावर अपक्ष उमेदवार रिंगणात उतरले आहेत. परंतु, हे अपक्ष उमेदवार मतदारांवर मोठा प्रभाव टाकतील, असे चिन्हे नसली तरी, या उमेदवारांनीही आपली ताकद पणाला लावली आहे.
सर्वसाधारणपणे निवडणुकीत अपक्ष फार मोठी भूमिका पार पाडतात. परंतु या जिल्ह्यात विधानसभा मतदारसंघाचा इतिहास पाहता अपक्ष उमेदवारांनी म्हणावी तेवढी कामगिरी केलेली दिसत नाही.
लोकसभा निवडणुकीतसुध्दा १९५१ पासूनच्या आकडेवारीनुसार आतापर्यंत फक्त ५० अपक्ष उमेदवारांनी विविध वेळी निवडणुक लढविली. काही अपवाद वगळता सर्वच निवडणुकांमध्ये अपक्षांच्या पारड्यात १० हजार मतांपेक्षा अधिक मते पडलीच नाहीत. किंबहूना टक्केवारी पाहता ५ टक्क्यांपेक्षा अधिक मतेही अपक्षांनी मिळविली नाहीत. निवडणुकांमध्ये अपक्ष उमेदवार मतांची विभागणी करण्यात मोठी भूमिका पार पाडतात. परंतु जालना जिल्ह्यात लोकसभेसह विधानसभेतसुध्दा अपक्षांचा दबाव काही जाणवलाच नाही. निवडणूक लढतांना ‘साम-दाम-दंड-भेद’ या नीतींचा वापर केला जातो. ओघानेच विरोधकांना धूळ चारण्यासाठी त्याच्या समाजाचा, त्याच्याच क्षेत्रातला ‘डमी’ उमेदवार उभा करून प्रतिस्पर्ध्याच्या मतांची विभागणी करण्याची कूटनिती आखण्यात येते. याव्यतिरिक्त काही इच्छूक उमेदवार आपले नशीब आजमावण्यासाठी निवडणूक रिंगणात उतरतात. त्यामुळेच अपक्ष उमेदवारांना मोठे महत्व प्राप्त होते.
परंतू या निवडणुकीत तसे चित्रही जाणवत नाही. कारण महायुती व आघाडी दोन्हीही संपुष्टात आल्याच्या पार्श्वभूमीवरच मुळात सर्व मतदारसंघात उमेदवारांची भाऊगर्दी झाली आहे. त्यातील निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या विविध पक्षांच्या इच्छूकांनी अंतिमक्षणी पक्षीय बंधने, वैचारिक बंधने वगैरे गुंडाळून अन्य पक्षात प्रवेश केला. उमेदवारी पटकावली व प्रचारयुध्दातही ते जुंपले. त्यामुळेच या पाचही मतदारसंघात अन्य कोणत्याही इच्छुकांनी बंडखोरीची भूमिका बजावली नाही. त्यास केवळ भोकरदन अपवाद. या मतदाररसंघात कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते एल. के. दळवी यांनी बंडखोरी केली. त्यापाठोपाठ कॉँग्रेसचे विद्यमान नगरसेवक पठाण यांनीही बंडाचे निशाण फडकावले. हे दोघेही अन्य पक्षात न जाता स्वबळावर अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे हे दोघे कितपत शक्ती दाखवणार याविषयी उत्सूकता निर्माण झाली आहे. एकूण या जिल्ह्यातील पाचही मतदारसंघात आतापर्यंत झालेल्या विविध निवडणुकांध्ये शेकडो अपक्ष उमेदवार होते. काही अपवाद वगळता त्यांना ५ हजारपेक्षा अधिक मते मिळाली नाहीत. अपक्ष उमेदवारांची संख्या वाढत असली तरीही ते मतदारांवर प्रभाव पाडू शकले नाहीत. मात्र, मतविभागणीत त्यांनी मोठा हातभार लावला.

Web Title: Empowering the Independent ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.