लिंबोळ््यांमुळे मिळाला रोजगार
By Admin | Updated: July 13, 2014 00:19 IST2014-07-12T23:45:49+5:302014-07-13T00:19:44+5:30
तळेगाव : भोकरदन तालुक्यातील तळेगाव परिसरात अद्यापही पेरणीयोग्य पाऊस नसल्याने परिसरातील मजुरांच्या हाताला काम नव्हते.

लिंबोळ््यांमुळे मिळाला रोजगार
तळेगाव : भोकरदन तालुक्यातील तळेगाव परिसरात अद्यापही पेरणीयोग्य पाऊस नसल्याने परिसरातील मजुरांच्या हाताला काम नव्हते. यातच लिंबोळ्या वेचून हे मजूर दिवसाकाठी २५० ते ३०० रुपयांची कमाई करत असून, त्यांना रोजगार मिळाला आहे.
परिसरातील पिंप्री, सावखेडा, वज्रखेडा, तळणी, पिंपळगाव कोलते, एकेफळ, खादगाव, तळेगाववाडी आदी गावातील मजूर रोज लिंबाच्या झाडाखाली असलेल्या लिंबोळ्या वेचत असून, दररोज अडीचशे ते तीनशे रुपये त्यांना रोख मिळत आहेत. लिंबोळ्याला ५ रुपये प्रतिकिलो असा भाव मिळत आहे.
एक मजूर दिवसाला ५० ते ६० किलो लिंबोळ्या वेचत आहे. त्यामुळे त्यांना चांगला रोज मिळत आहे. या भागात लिंबोळ्या विकत घेणाऱ्या व्यापाऱ्यांची संख्या जास्त असल्यामुळे लिंबोळ्याला भाव मिळत आहे. व्यापारी दररोज ३० ते ४० क्विंटल लिंबोळ्या जमा करीत आहेत.
पाऊस नसल्यामुळे अनेक मजूर लिंबोळ्या वेचण्यासाठी सकाळीच घराबाहेर पडत आहेत. त्यामुळे या भागातील मजुरांना चांगला रोजगार मिळाला आहे.
या भागात कोठेही रोजगार हमी योजनेची काम सुरू नसल्यामुळे कामे मिळत नसल्याचे अनेक मजुरांचे म्हणणे आहे. परंतु लिंबोळ्यातून रोजगार मिळत असल्याने थोडा का होईना त्यांना दिलासा मिळाला आहे.(वार्ताहर)
शाळेला दांडी
लिंबोळी वेचण्यासाठी कुणाचीही आडकाठी येत नसल्याने शालेय मुलेही शाळेला दांडी मारुन आपापले व आई-वडिलांसोबत लिंबोळ्या वेचण्यासाठी जात असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे शिक्षकांचाही काही प्रमाणात नाईलाज होत आहे.