विधानसभा इच्छुकांचा दौऱ्यांवर जोर

By Admin | Updated: September 2, 2014 23:59 IST2014-09-02T23:58:01+5:302014-09-02T23:59:07+5:30

हिंगोली : जिल्ह्यात सध्या सर्वच पक्षांतील इच्छुकांची मोठी घालमेल होत आहे.

Emphasis on the tour of the Assembly wanting | विधानसभा इच्छुकांचा दौऱ्यांवर जोर

विधानसभा इच्छुकांचा दौऱ्यांवर जोर

हिंगोली : जिल्ह्यात सध्या सर्वच पक्षांतील इच्छुकांची मोठी घालमेल होत आहे. विद्यमान दोन आमदारांशिवाय इतर कोणालाही तिकिटाची खात्रीच नसल्याने ना कोणी थेट तयारीला लागले ना कोणी उमेदवारीची खात्री बाळगून असल्याचे दिसते. त्यातच बिघाडीच्या वावड्यांमुळे सगळ्याच पक्षातील इच्छुक चाचपणीसाठी दौरे करीत आहेत.
आघाडी व महायुतीत वरच्या स्तरावर सर्वच काही आलबेल असल्याचे दिसत नाही. महायुतीतील जागा वाटपावरून दररोज वेगवेगळ्या बातम्या ऐकायला मिळतात. त्यामुळे स्वबळाची तयारी झालीच तर आपल्याला संधी मिळेल काय, याची चाचपणी दोन्ही पक्षांतून होत आहे. भाजपाने हिंगोली जिल्ह्यात इच्छुकांच्या मुलाखती घेताना तिन्ही मतदारसंघातील इच्छुक बोलावले होते. राष्ट्रवादीनेही अशाच प्रकारची भूमिका घेत तिन्ही मतदारसंघातील इच्छुक जाणून घेतले. मात्र मतदारसंघ निश्चिती नसल्याने पूर्वी ज्या-त्या पक्षाकडे असलेल्या मतदारसंघांवर असलेला दावा कायम असल्याचेच मानले जाते. त्यात विद्यमान आमदार असल्याने कॉंग्रेस-राकॉंत बदलाची फारशी अपेक्षा नाही. केवळ हिंगोली लोकसभा कॉंग्रेसला सोडल्यामुळे तसेच यापूर्वी कळमनुरी राष्ट्रवादीच्याच कोट्यातील असल्याने या मतदारसंघावर तेवढा राष्ट्रवादी जोरदार दावा करू लागली आहे. मात्र कॉंग्रेसकडून हा मतदारसंघ सोडला जाण्याची सुतराम शक्यता नाही. या भानगडीत दोन्हीकडील इच्छुकांचा जीव टांगणीला लागला आहे. हिंगोलीत भाजपात उमेदवारीवरून जोरदार रस्सीखेच आहे. ती कोणाला मिळेल, याचा छातीठोक दावा करणे कोणालाही शक्य नाही. हाच प्रकार शिवसेनेत सुरू आहे. कळमनुरी व वसमतमध्ये दोन गट आमनेसामने असल्याने कोणाची नाराजी होणार? हा प्रश्नच आहे.
या एकंदर प्रकारामुळे पक्षश्रेष्ठींकडे जोर लावण्यासाठी सर्वच पक्षातील इच्छुक मुंबई, दिल्लीचे दौरे करीत आहेत. त्यात शेवटी यश कोणाला मिळेल, हे सांगता येणार नाही. मात्र त्यामुळे मतदारसंघात कोणी फारसे फिरकत नसून दौऱ्याहून परतल्यानंतर पुन्हा गाठीभेटी सुरू केल्या जात आहेत.

Web Title: Emphasis on the tour of the Assembly wanting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.