अक्षय तृतीयेला ऑनलाईन खरेदीवर भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:04 IST2021-05-15T04:04:17+5:302021-05-15T04:04:17+5:30
औरंगाबाद : लॉकडाऊन असला तरी शहरवासीयांनी ऑनलाईन खरेदीचा मुहूर्त साधला. दिवसभरात बांधकाम क्षेत्रात ५० कोटींची तर सोन्यात २ ...

अक्षय तृतीयेला ऑनलाईन खरेदीवर भर
औरंगाबाद : लॉकडाऊन असला तरी शहरवासीयांनी ऑनलाईन खरेदीचा मुहूर्त साधला. दिवसभरात बांधकाम क्षेत्रात ५० कोटींची तर सोन्यात २ कोटींची उलाढाल झाली.
साडेतीन मुहूर्तांपैकी एक संपूर्ण मुहूर्त असलेल्या अक्षय तृतीयेला नावीन खरेदी केली जात असते. मात्र, लॉकडाऊनमुळे सर्व दुकाने बंद असल्याने ग्राहकांना बाजारपेठेत जाऊन प्रत्यक्ष खरेदी करता आली नाही. मात्र, मुहूर्त हुकू द्यायचा नाहीए असे मानणाऱ्या काही ग्राहकांनी ऑनलाईन खरेदी करत मुहूर्ताचे सोने केले. शहरात बड्या सुवर्णपेढीने ऑनलाईन सोने बुकिंगची सुविधा उपलब्ध करून दिली होती. मुहूर्तावर आजच्या भावात सोने खरेदी करा व ब्रेक द चेन संपल्यावर सोने घरी घेऊन जा, अशी ऑफर देण्यात आली होती. याचा फायदा काही ग्राहकानी घेतला. यासंदर्भात सराफा असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र मंडलिक यांनी सांगितले की, आज ४९,५०० रुपये प्रति १० ग्रॅम भाव होता. शहरात मोठ्या सुवर्ण पिढीत सुमारे २ कोटींचे सोने ऑनलाईन बुकिंग झाले. या ग्राहकांना लॉकडाऊन संपल्यानंतर आजच्या भावात सोने मिळेल. बाकी छोट्या व मध्यम स्वरूपाची दुकाने बंद होती.
बांधकाम क्षेत्रातही शुक्रवारी दिवसभरात ७० फ्लॅटची बुकिंग झाली. त्यातील २० फ्लॅटची बुकिंग ऑनलाईन झाली. यासंदर्भात क्रेडाईचे अध्यक्ष नितीन बगडीया यांनी सांगितले की, दरवर्षी अक्षय तृतीयेला शहरात २०० पेक्षा अधिक फ्लॅट, रोहाऊस बुक होत असतात. मात्र, यंदाही लॉकडाऊन असल्याने अनेकांना बांधकाम व्यावसायिकांच्या कार्यालयापर्यंत येत आले नाही. मात्र, अशा परिस्थितीतही ७० फ्लॅट बुक होणे ही बांधकाम क्षेत्राच्या दृष्टीने समाधानाची बाब आहे.
यातील २० फ्लॅट ऑनलाईन बुक झाले हे विशेष. आज काही ग्राहकांनी अक्षय तृतीयेचा मुहूर्त साधत नवीन घरात पूजन करून घेतले. लॉकडाऊन असल्याने घर शिफ्ट करता आले नाही. लॉकडाऊन उठल्यानंतर अनेक ग्राहक नवीन घरात शिफ्ट होतील.
चौकट
इलेक्ट्रॉनिक्स बाजारात शांतता
इलेक्ट्रॉनिक्स बाजारात टीव्ही, फ्रीज, एसी, वाशिंग मशीनची कोटींची उलाढाल होत असते पण लॉकडाऊनमुळे दुकाने उघडी नव्हती. गुढीपाडवा ते अक्षय तृतीयेदरम्यान दरवषी एकूण वर्षातील ४० टक्के उलाढाल होत असते. पण यंदा दुसऱ्या वर्षी याच काळात लॉकडाऊन आला, अशी माहिती पंकज अग्रवाल यांनी दिली.