आमदारांचा भर सभागृहावर

By Admin | Updated: July 25, 2014 00:29 IST2014-07-25T00:24:21+5:302014-07-25T00:29:57+5:30

विशाल सोनटक्के , उस्मानाबाद एखाद्या गल्लीसाठी रस्त्याचे काम केले की दुसऱ्या गल्लीतील लोकांचीही मागणी होते. त्याऐवजी सभागृह बांधून दिले की, संपूर्ण गाव खुश होते.

Emphasis for the legislators on the hall | आमदारांचा भर सभागृहावर

आमदारांचा भर सभागृहावर

विशाल सोनटक्के , उस्मानाबाद
एखाद्या गल्लीसाठी रस्त्याचे काम केले की दुसऱ्या गल्लीतील लोकांचीही मागणी होते. त्याऐवजी सभागृह बांधून दिले की, संपूर्ण गाव खुश होते. मोठ्या शहरात विशिष्ट वस्तीत बांधलेल्या सभागृहामुळे त्या भागातील संबंधित समाज पाठीशी राहतो यामुळेच की काय जिल्ह्यातील बहुतांश आमदारांनी आपल्या स्थानिक विकास निधीतून सभागृह बांधण्यावर मोठा भर दिल्याचे दिसते. २०१३-१४ मध्ये जिल्ह्यात नव्याने १०८ सभामंडप, सभागृहे उभारण्यात आली आहेत.
प्रत्येक वर्षी आमदारांना २ कोटींचा स्थानिक विकास निधी मिळतो. या निधीतून स्थानिक लोकांच्या मागणीनुसार विकासकामे करणे अपेक्षित असते. २०१३-१४ या वर्षामध्ये जिल्ह्यातील आमदारांनी सुमारे ११ कोटी ७० लाखाच्या कामांना प्रशासकीय मान्यता मिळविली आहे. या निधीतून रस्ते, समाज मंदिर, सभामंडप, व्यायामशाळा, पाणीपुरवठा योजना यासह शाळांना संगणक, डेस्कसह शैक्षणिक साहित्य पुरविणे, व्यायाम शाळांना साहित्य खरेदीसाठी निधी देण्यात येतो. जिल्ह्यातील बहुतांश आमदारांनी या सर्व कामासाठी आपला निधी दिला असला तरी सभामंडप व सभागृहाची सर्वाधिक म्हणजे तब्बल १०८ कामे या निधीतून साकारत आहेत. प्राप्त माहितीनुसार आ. ज्ञानराज चौगुले यांनी ३० सभागृहासाठी, पालकमंत्री मधुकरराव चव्हाण यांनी २२ सभागृहासाठी, आ. ओम राजेनिंबाळकर यांनी ३५ सभागृहासाठी, आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी १८ सभागृहासाठी तर आ. राहुल मोटे यांनी ३ सभागृहासाठी आपल्या फंडातून निधी दिला आहे. सभामंडप, सभागृहानंतर बहुतांश आमदारांनी स्थानिक विकास निधीचा वापर रस्ते बांधणी, दुरुस्ती, मजबुतीकरण, पूल, नाली व सिमेंट रस्ता बांधकामासाठी केल्याचे दिसून येते. आ. राहुल मोटे व पालकमंत्री मधुकरराव चव्हाण यांनी प्रत्येकी १३ रस्ते कामाला निधी दिला आहे. तर राणाजगजितसिंह पाटील यांनी १०, आ. ओम राजेनिंबाळकर व आ. ज्ञानराज चौगुले यांनी प्रत्येकी ५ रस्त्यांच्या कामांसाठी स्थानिक विकास फंडाचा वापर केल्याचे दिसते.
आ. राहुल मोटे यांनी सभागृह व रस्त्याच्या कामाबरोबर ३ वाचनालयांना पुस्तक तसेच फर्निचर पुरविले आहे. याबरोबरच पाणी पुरवठा योजनांकडेही त्यांनी लक्ष दिल्याचे दिसते. अशा योजनांची १० कामे त्यांच्या फंडातून करण्यात येत आहेत. यात सोनारी पाणीपूुरवठा योजनेसह रुई, सारोळा, वालवडसह इतर ठिकाणी विंधन विहीर घेणे, विहिरीवर मोटार, सिन्टेक्स टाकी बसविणे आदी कामे करण्यात आली आहेत.
पालकमंत्री मधुकरराव चव्हाण यांनी तुळजापूरसह उस्मानाबाद तालुक्यातील गावात सभामंडप, सभागृहासह रस्त्यांची कामे केली आहेत. याबरोबरच नळदुर्ग येथे दोन ठिकाणच्या सार्वजनिक रस्त्यावर पथदिवे उभारले आहेत. तर मौजे इर्ला येथील मुस्लीम स्मशानभूमीस संरक्षण भिंत बांधण्यासाठी निधी दिल्याचेही दिसून येते. असे असले तरी चव्हाण यांचाही भर सभागृहे व रस्ते कामावर असल्याचे दिसून येते.
राणाजगजितसिंह पाटील यांनी आपल्या फंडातून सर्वाधिक कामे पाणीपुरवठ्याच्या संदर्भात केली आहेत. पाटील यांनी १८ सभागृह, सभामंडपासाठी निधी दिला आहे. तर पाणी पुरवठा योजनेसंदर्भातील सर्वाधिक म्हणजे २१ कामासाठी त्यांनी निधी पुरविला आहे. याबरोबरच क्रीडा क्षेत्रासाठीही पाटील यांनी सर्वाधिक म्हणजे ९ लाखाचा निधी दिला आहे. यामध्ये ५ व्यायाम शाळासाठी साहित्य खरेदीचा समावेश आहे. याबरोबरच राज्यस्तरीय युवा महोत्सव व रस्सीखेच आणि बॉल बॅडमिंटन यांच्या स्पर्धासाठीही त्यांनी निधी दिला आहे.
आ. ज्ञानराज चौगुले यांनी सभागृहाची ३० कामे केली आहेत. यासोबतच बलसूर येथील सखुबाई माध्यमिक आश्रम शाळा तसेच उमरग्याच्या उर्दु हायस्कूलला संगणक व प्रिंटर घेण्यासाठी निधी दिला आहे. याबरोबरच लोहारा येथे बसस्थानक बांधण्यासाठी विशेष बाब म्हणून १० लाख रुपयेही दिले आहेत. मात्र तरीही आ. चौगुले यांचा भर सभामंडप, सभागृहावर असल्याचे दिसून येते. उमरगा तालुक्यातील भूसणी, मौजे दस्तापूर, मौजे काळनिंबाळा येथे विशेष घटक योजनेंतर्गतच्या कामांनाही त्यांनी निधी दिला आहे.
आ. ओम राजेनिंबाळकर यांनी सर्वाधिक म्हणजे ३५ सभामंडपाच्या कामासाठी स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत निधी दिला आहे. याबरोबरच मतदार संघात ५ ठिकाणी त्यांनी रस्ते कामालाही निधी दिला असून, आदर्श प्राथमिक विद्यामंदिरला १ संगणक दिला असून, आर्य चाणक्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेला ७ संगणक व एक प्रिंटर घेण्यासाठी निधी वितरित केला आहे. कळंब तालुक्यातील उपळाई येथे दोन ठिकाणी पाण्याची टाकी बांधून विद्युत पंप बसविण्यासाठीही त्यांनी निधीचे वितरण केले आहे.

Web Title: Emphasis for the legislators on the hall

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.