ईएमआय बदलणारी टोळी?
By Admin | Updated: March 30, 2016 00:09 IST2016-03-29T23:50:11+5:302016-03-30T00:09:14+5:30
नांदेड :कोणत्याही मोबाईलचा आयएमईआय क्रमांक हा खूप महत्वाचा असतो़ यापूर्वी चोरीच्या मोबाईलचे आयएमईआय क्रमांक बदलण्यासाठी हैदराबाद येथे पाठविण्यात येत होते़

ईएमआय बदलणारी टोळी?
नांदेड :कोणत्याही मोबाईलचा आयएमईआय क्रमांक हा खूप महत्वाचा असतो़ यापूर्वी चोरीच्या मोबाईलचे आयएमईआय क्रमांक बदलण्यासाठी हैदराबाद येथे पाठविण्यात येत होते़ त्यामुळे पोलिसांनाही ट्रॅकींगमध्ये असे मोबाईल सापडत नव्हते़ त्यात आता नांदेडातही आयएमईआय क्रमांक बदलण्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला असून यामागे मोठे रॅकेट असण्याची शक्यता नाकारता येत नाही़
नांदेडात हा प्रकार सुरु असताना गांधी पुतळ्याजवळील एका दुकानावर स्थानिक गुन्हे शाखेने छापाही मारला़ साहित्यही जप्त केले़ परंतु त्यानंतर गेले १५ दिवस तपास सुरु असल्याच्या नावाखाली हे प्रकरण थंडबस्त्यात टाकण्यात आले आहे़ नांदेड शहरात महिन्याकाठी शेकडो मोबाईल चोरीस जातात़ यामध्ये ज्यांच्याकडे मोबाईलचे पक्के बिल आहे अशापैकी काहीच जण मोबाईल हरवल्याची तक्रार संबंधित पोलिस ठाण्यात करतात़, परंतु एकदा चोरीस गेलेला मोबाईल पुन्हा कधीही सापडत नाही ही गोष्ट खरी़
त्यानंतर हे चोरीचे मोबाईल थेट हैदराबादकडे पाठविण्यात येतात़ नांदेडात अशाप्रकारे चोरीचे मोबाईल विकत घेणारी मोठी टोळी कार्यरत आहे़ हैदराबाद येथे या मोबाईलचे आयएमईआय क्रमांक बदलून ते पुन्हा विक्री केले जातात़ विशेष म्हणजे एखाद्या गुन्ह्याच्या तपासात आयएमईआय क्रमांक महत्वाचा मानला जातो़ त्या आधारे न्यायालयात अनेक प्रकरणात शिक्षाही होते़
क्रमांक बदलण्याचा असा प्रकार नुकतेच नांदेडातही उघडकीस आला आहे़ नांदेडातील एका ग्राहकाने आपला मोबाईल दुरुस्तीसाठी गांधी पुतळ्याजवळील एका दुकानात दिला होता़ परंतु या ठिकाणी त्या मोबाईलच्या आयएमईआय क्रमांकात खाडाखोड केल्याचे त्यांच्या लक्षात आले़ त्यांनी ही बाब लगेच स्थानिक गुन्हे शाखेतील अधिकाऱ्यांना सांगितली़ त्यानंतर १४ मार्च रोजी स्थागुशाने या दुकानावर छापा मारुन १४० मोबाईल आणि ३ मदरबोर्ड जप्त केले होते़ हे सर्व साहित्य स्थानिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात जमा करण्यात आले़ परंतु या प्रकरणात अद्यापही गुन्हा दाखल करण्यात आला नाही़
त्याचबरोबर जप्त केलेले साहित्य तपासणीसाठी तांत्रिक विभागाकडे देण्यात आल्याचे स्थानिक गुन्हे शाखेचे म्हणणे आहे़ परंतु आयएमईआय क्रमांक बदलण्याच्या गंभीर प्रकाराबाबत मंदगतीने सुरु असलेल्या तपासाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे़
मोबाईलच्या ईएमआय बदल प्रकरणात पोलिसांच्या तपासाची दिशा योग्य राहिल्यास मोबाईल चोरी करणारी आणि आयएमईआय क्रमांक बदलणारी मोठी टोळी पोलिसांच्या हाती लागू शकते हे मात्र नक्की़ (प्रतिनिधी)