शिक्षण प्रवाहातून उभारी
By Admin | Updated: July 17, 2014 00:21 IST2014-07-17T00:10:12+5:302014-07-17T00:21:54+5:30
गंगाधर तोगरे, कंधार शिक्षण प्रवाहात सर्वांना सामावून घेण्यासाठी शासनाने कोणतीही कसर ठेवली नाही.

शिक्षण प्रवाहातून उभारी
गंगाधर तोगरे, कंधार
शिक्षण प्रवाहात सर्वांना सामावून घेण्यासाठी शासनाने कोणतीही कसर ठेवली नाही. विशेष गरजा असणाऱ्या ५८६ मुलांना शिक्षण प्रवाहातून उभारी देण्यासाठी सर्वशिक्षा अभियानातील अपंग समावेशीत शिक्षण उपक्रमाचा मोठा आधार मिळत असल्याचे दिसते. अपंगत्वावर मात देवून उन्नतीचा मार्ग धरतानाचे चित्र आशादायक असून प्रेरणादायी आहे.
स्वातंत्र्यपूर्व कालखंडात ग्रामीण भागातील दारिद्र्य अवस्थेत व कनिष्ठ जातीत जगणाऱ्यांना शिक्षण मिळाले पाहिजे, असा महात्मा फुले यांनी आग्रह धरला. म. फुले यांनी परिवर्तन नितीच्या सापेक्षतेने शिक्षण विषयक सिद्धांत मांडला. केवळ सिद्धांत न मांडता समाज परिवर्तनासाठी त्यांनी कृतीशीलतेवर भर दिला. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणाला वाघीणीच्या दुधाची उपमा दिली. शिक्षणाची महती महापुरुषांनी, समाजसुधारकांनी अनेकदा अधोरेखीत केली. समाजात प्रचलित असलेल्या अघोरी रुढी, परंबपरा, असमानता, अन्याय, अत्याचाराविरोधात लढण्याचे बळ शिक्षणातून मिळते. अशी क्रांतीकारक विचारधारा फुले, शाहू, आंबेडकर आदीच्या मौलिक विचारातून दिसते. त्यासाठी समता, बंधुत्व, न्याय मिळवून देणारी शिक्षण पद्धती असावी. यावर महापुरुषांचा अधिक भर राहिला.
स्वातंत्र्यानंतर शासनस्तरावरुन धर्म, जात, पंथ, वंश, रंग आदीत भेदगाव न करता सर्वासाठी शिक्षणाची दारे उघडण्यात आली. कमकुवत, वंचित, उपेक्षीत पतहीन, अज्ञानी, रंजले, गांजलेल्यांना शिक्षण प्रवाहात आणण्यासाठी विविध सोयी-सुविधा दिल्या जाऊ लागल्या. मोफत पाठ्यपुस्तके, मोफत गणवेश, मुलींना उपस्थिती भत्ता आदी योजनेतून देण्याची सोय शासनाने केली. त्याच पद्धतीने सर्व शिक्षण हा उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात आला. विशेष गरजा असणाऱ्या मुलांचे शिक्षण हे सर्वसामान्य शिक्षणातील अविभाज्य घटक मानला गेला आणि गरजेनुसार सर्वसामान्य शिक्षण योजनेत सहभागी करुन घेण्यात आले.
सर्वसमावेशित शिक्षण उपक्रम गटशिक्षणाधिकारी गंगाधर राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली एस. एस. मलगिरवार, पी. जी. काळे या विशेष तज्ज्ञांच्या सहकार्यातून पी. डी. ढवळे, एस. एस. गायकवाड, डी. एस. चाटे, एस. बी. सूर्यवंशी, पी. एम. सोनकांबळे, जे. एम. स्वामी, तपासे या अंध व मतिमंद, अपंग शाळा वगळून जि. प. व शासनमान्य खाजगी शाळेत विशेष शिक्षकामार्फत अपंग मुलांना अध्यापन केले जाते. अध्यापनात ब्रेललिपी, स्पीच थेरपी आदींचा तसेच शैक्षणि साहित्य, उजळणी याचा वापर केला जातो.
अपंग प्रकारानुसार सर्व बाबी शिकविल्या जातात. तीनचाकी सायकल १, व्हील चेअर मोठ्या ४, व्हील चेअर लहान ९, कुबडी जोड २, अंधकाठी १, अंधपाटी १, रोलेटर लहान १०, रोलेटर मोठे १, कॅलीपर ११ अशा चाळीस साहित्यांचे मोफत वाटप २७ जणांना मागील वर्षी करण्यात आले. शाळेत ७५ टक्के उपस्थित असणाऱ्यांना सोबत मदतनिसास प्रवास व मदतनीस भत्ता ३३ जणांना देण्यात आला.
अपंग मुुलांचा आत्मविश्वास वाढविणे, न्यूनगंडाची भावना कमी करणे, भाषा वाढीस चालना देणे व वर्तन समस्या कमी करणे, जिद्द व चिकाटी वाढविणे, सामाजिकीकरण करणे व कमी वयातील अपंगत्व कमी करण्यासाठी उपचार करुन बरा करणे यासाठी प्रयत्न केले जातात. माता-पालकांना जागे करुन मुला-मुलींना शाळेत प्रवेशासाठी प्रयत्न केले जातात. समावेशित शिक्षणातून अपंगत्वावर मात करुन नवी उभारी देण्याचा प्रयत्न सर्वशिक्षा अभियानाअंतर्गत केले जात आहेत़
बहुविकलांग मुलांचा समावेश
५८६ अपंग असणाऱ्या विद्यार्थी संख्येत ३४९ मुले व २३७ मुलींचा समावेश आहे. अपंग प्रकार असा-अल्पदृष्टी मुले ४१, मुली ३७, दृष्टीदोष मुले १४, मुली १४, कर्णबधीर मुले ११, मुली १४, वाचादोष मुले ३७, मुली १७, अस्थिव्यंग मुले ११६, मुली ५७, मतिमंद मुले ९६, मुली ५९, बहुविकलांग मुले ८, मुली ९, मेंदूचा पक्षघात मुली २,अध्ययन अक्षम मुले २७, मुली २७, स्वमग्न मुले ३ व १ मुलीचा समावेश आहे़