उदगीरचा पाणीपुरवठा विस्कळीत

By Admin | Updated: May 29, 2014 00:33 IST2014-05-29T00:10:13+5:302014-05-29T00:33:24+5:30

उदगीर : उदगीर शहर पाणीपुरवठा विस्कळीत झाल्यामुळे मंगळवारी नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे व माजी आ. चंद्रशेखर भोसले यांनी महावितरणच्या विभागीय कार्यालयात बैठा सत्याग्रह केला

Emergency water supply disrupted | उदगीरचा पाणीपुरवठा विस्कळीत

उदगीरचा पाणीपुरवठा विस्कळीत

उदगीर : कमी दाबाने होणार्‍या वीजपुरवठ्यामुळे उदगीर शहर पाणीपुरवठा विस्कळीत झाल्यामुळे मंगळवारी नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे व माजी आ. चंद्रशेखर भोसले यांनी महावितरणच्या विभागीय कार्यालयात बैठा सत्याग्रह केला. वीजपुरवठा सुरळीत झाल्याशिवाय कार्यालयातून न उठण्याचा पवित्रा माजी आमदार व नगराध्यक्षाने घेतल्यानंतर महावितरणच्या अभियंत्याची मोठी भंबेरी उडाली. उदगीर शहराला बनशेळकी व देवर्जन प्रकल्पातून पाण्याचा पुरवठा सुरू आहे. तब्बल १७ महिन्यांपासून बंद ठेवण्यात आलेला भोपणी प्रकल्पातील पाणीपुरवठा चार दिवसांपूर्वीच सुरू करण्यात आला आहे. ही योजना बंद ठेवण्यात आल्यामुळे या विद्युत वाहिनीला वाढलेल्या झाडांच्या फांद्या लागून ही विद्युत वाहिनी सतत बंद पडत होती. शिवाय, भोपणी-देवर्जन व बनशेळकी धरणावर पालिकेच्या एक्स्प्रेस फिडरच्या विद्युत मोटारींना आवश्यक असलेला विद्युत प्रवाह मिळत नसल्यामुळे विद्युत मोटारी सतत बंद पडतात. यामुळे शहराला दर सहा ते सात दिवसांआड मिळणारे पाणी २० ते २५ दिवसांआड मिळत आहे. पालिकेच्या वतीने महावितरणच्या कार्यालयास वेळोवेळी या संदर्भात कळवूनही वीजपुरवठा सुरळीत केला जात नाही. त्यामुळे माजी आ. चंद्रशेखर भोसले, नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे, उदयसिंह मुंडकर यांनी कार्यकारी अभियंत्यास घेराव घालून कार्यालयात दिवसभर बैठा सत्याग्रह केला. यामुळे महावितरणच्या अधिकार्‍यांची चांगलीच भंबेरी उडाली. या बैठा सत्याग्रहामुळे भोपणी प्रकल्पाकडे गेलेल्या एक्स्प्रेस फिडरला लगत असलेल्या झाडांच्या फांद्या तोडण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. याशिवाय १३२ के.व्ही. केंद्रात तात्काळ ५० एमव्हीएचा ट्रान्सफार्मर बसविण्यासाठी आपण वीज पारेषणच्या वरिष्ठ अधिकार्‍यांना सांगितले आहे, अशी माहिती महावितरणचे कार्यकारी अभियंता वायकोस यांनी पत्रकारांना दिली. शिवाय, बनशेळकी, देवर्जन व भोपणी प्रकल्पावरील एक्स्प्रेस फिडरच्या मोटारींना आवश्यक असलेला वीजपुरवठा आजच सुरळीत करीत असल्याचे कार्यकारी अभियंता वायकोस म्हणाले. (वार्ताहर) उदगीरच्या १३२ के.व्ही. केंद्रासाठी २ वर्षांपूर्वी ५० एम.व्ही.ए.ची तीन ट्रान्सफार्मर मंजूर झालेली होती. ती अद्याप का बसविण्यात आली नाहीत, ही कामे झाली नसल्यामुळे या केंद्रातून गेलेल्या ३३/११ के.व्ही. विद्युत लाईनवर २४/९ च्या प्रवाहाने विद्युतपुरवठा केला जातो. ही कामे का झाली नाहीत? ती तात्काळ करण्याची मागणीही माजी आ. चंद्रशेखर भोसले व नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे यांनी यावेळी केली.

Web Title: Emergency water supply disrupted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.