युवकांच्या पदार्पणामुळे प्रस्थापितांचे सत्ता समीकरण जुळेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:11 IST2021-01-08T04:11:25+5:302021-01-08T04:11:25+5:30
कैलास पांढरे केऱ्हाळा : गेल्या कित्येक वर्षांपासून ग्रामपंचायतीवर आपलीच सत्ता अबाधित ठेवणाऱ्या प्रस्थापित राजकीय पुढाऱ्यांची यंदाच्या निवडणुकीत चांगलीच धांदल ...

युवकांच्या पदार्पणामुळे प्रस्थापितांचे सत्ता समीकरण जुळेना
कैलास पांढरे
केऱ्हाळा : गेल्या कित्येक वर्षांपासून ग्रामपंचायतीवर आपलीच सत्ता अबाधित ठेवणाऱ्या प्रस्थापित राजकीय पुढाऱ्यांची यंदाच्या निवडणुकीत चांगलीच धांदल उडाली. कारण गावातील युवकांनी या निवडणुकीत उडी घेतल्याने प्रस्थापितांना सत्ता समीकरण जुळविता जुळविता नाकी नऊ आले आहेत, तर यंदा गावात शिवसेना-भाजपप्रणीत पॅनल आमनेसामने असल्याने चुरशीची लढत पाहावयास दिसत आहे.
केऱ्हाळा गावातील ग्रामपंचायतीचे राजकारण हे विविध पक्षांवर अवलंबून आहे. भाजप पक्षाच्या जोरावर सरपंच, उपसरपंच पदापर्यंत पोहोचलेले दत्ता कुडके यांनी गावातील अंतर्गत गटबाजीला पूर्णविराम देत निवडणुकीच्या तोंडावर राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्याशी घरोबा करीत शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत शिवसेना - भाजप अशी चुरस पाहावयास दिसून येत आहे. शिवसेनेचे कुडके यांच्या विरुद्ध कडवे आव्हान देण्यासाठी पंचायत समितीच्या विद्यमान सदस्या कविता बांबर्डे व माजी सभापती शंकरराव माने यांनीही युवकांना निवडणुकीत उतरविले आहे. यंदाच्या निवडणुकीत गेल्या पंचवार्षिकमध्ये सदस्य म्हणून असलेले चार जण पुन्हा निवडणुकीच्या आखाड्यात उतरले आहेत. एकाच पॅनलचा वचननामा जाहीर केल्याने प्रचारातील रणधुमाळी पाहावयास दिसून येत आहे.
-----
१९ वर्षांचा युवक उमेदवार
फय्याज शेख सलीम हे वयाच्या १९ वर्षी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. गावातील सर्वात कमी वयाचे उमेदवार म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली असून वॉर्ड क्रमांक तीनमधून ते नशीब अजमावत आहेत. तर वाॅर्ड क्रमांक तीनमधून ६२ वर्षांच्या जाईबाई ओंकार पांढरे यासुद्धा उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उतरल्या आहेत.
-----------
सत्तारांच्या फोटोमुळे मतदारांमध्ये संभ्रम
केऱ्हाळा ग्रामपंचायत ही १३ सदस्यांची ग्रामपंचायत आहे. यासाठी तब्बल ३६ उमेदवार हे निवडणुकीच्या रिंगणात आपले नशीब अजमावत आहेत. त्यापैकी २४ उमेदवार तर आपल्या प्रचाराच्या पोस्टर, बँनर, स्टीकरवर राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचा फोटो वापरून प्रचार करीत आहेत. या प्रकारामुळे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे.
-------
ग्रामपंचायत केऱ्हाळा
१) एकूण सदस्य संख्या : १३
२) एकूण मतदार संख्या : ४२२७
३) महिला मतदारांची संख्या : १९९२
४) पुरुष मतदारांची संख्या - २२३५
फोटो :