छावण्यांमध्ये संतापाचा भडका !
By Admin | Updated: February 17, 2016 00:39 IST2016-02-16T23:47:13+5:302016-02-17T00:39:37+5:30
बीड : जिल्ह्यात दुष्काळाची दाहकता वाढत असताना सोमवारी महसूल व वनविभागाने काढलेल्या छावण्या बंदच्या आदेशाचे तीव्र पडसाद मंगळवारी उमटले

छावण्यांमध्ये संतापाचा भडका !
बीड : जिल्ह्यात दुष्काळाची दाहकता वाढत असताना सोमवारी महसूल व वनविभागाने काढलेल्या छावण्या बंदच्या आदेशाचे तीव्र पडसाद मंगळवारी उमटले. ठिकठिकाणच्या छावण्यांमध्ये शेतकऱ्यांनी संतप्त भावना व्यक्त केल्या. पालवण (ता. बीड) येथील शिवसंग्रामच्या छावणीत महसूलमंत्र्यांचा पुतळा जाळून छावणी बंदच्या आदेशाची होळी करण्यात आली. त्यामुळे छावणी आंदोलन पेटण्याची चिन्हे आहेत.
रबी हंगामातून उपलब्ध होणारा चारा तीन महिने पुरेल असा अहवाल कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिला होता. जिल्हाधिकाऱ्यांनी यासंदर्भात शासनाला कळविले होते. त्यानंतर महसूल व वनविभागाचे उपसचिव अशोक आत्राम यांनी छावण्या बंद करण्याची कार्यवाही करावी, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले. या आदेशाने छावणीचालकांसह शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर पसरला. पोटच्या लेकरागत जपलेली जनावरे छावण्यांतून गोठ्यात आली तर त्यांना चारा- पाणी उपलब्ध करायचा कसा? असा सवाल उपस्थित होत आहे.
भाजप- सेनेच्या सत्तेत भागीदार असलेल्या शिवसंग्रामच्या पदाधिकाऱ्यांनी या निर्णयाविरोधात जाहीर नाराजी व्यक्त केली. शिवसंग्राम युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष राजेंद्र मस्के संचालक असलेल्या पालवण (ता. बीड) येथील छावणीत महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. याशिवाय शासनआदेशाची होळी करुन संतापाला वाट मोकळी करुन दिली. यावेळी मस्के यांच्यासह मनोज जाधव, मनोज आगे व पशुपालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिवसंग्राम, काँग्रेसने बोलावली बैठक
बुधवारी चारा छावणी बंदचा निर्णय हाणून पाडण्यासाठी आंदोलनाचीदिशा ठरविण्याकरता कॉँग्रेस व शिवसंग्राम संघटनेने स्वतंत्र बैठका बोलावल्या आहेत. छावणीचालक, पशुपालक व शेतकऱ्यांना पाचारण केले आहे.
किसान सभेकडून निषेध
चारा छावण्या बंद करु नयेत, अशी मागणी किसान सभेने मंगळवारी केली आहे. या निर्णयाचा पुर्नविचार करण्यासाठी निषेध करण्यात आला. जिल्ह्यात दुष्काळी स्थिती गंभीर आहे. आत्महत्या वाढत आहेत. त्यामुळे छावण्या बंदचा निर्णय शेतकऱ्यांच्या जखेमवर मीठ चोळणारा असल्याचे जिल्हा सचिव कॉ. विनोद सवासे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)