आक्रमक निमशिक्षकांपुढे प्रशासन नरमले !
By Admin | Updated: January 3, 2017 23:26 IST2017-01-03T23:25:37+5:302017-01-03T23:26:16+5:30
उस्मानाबाद : रिक्त जागा होवूनही जिल्हा परिषदेकडून नियुक्ती देण्यास टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप करीत निमशिक्षकांनी मंगळवारी आक्रमक पवित्रा घेत आंदोलन केले.

आक्रमक निमशिक्षकांपुढे प्रशासन नरमले !
उस्मानाबाद : रिक्त जागा होवूनही जिल्हा परिषदेकडून नियुक्ती देण्यास टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप करीत निमशिक्षकांनी मंगळवारी आक्रमक पवित्रा घेत आंदोलन केले. चक्क जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारातच ठिय्या मांडून अधिकाऱ्यांवर अक्षरश: आरोपांच्या फैरी झाडल्या. नियुक्ती आदेश मिळाल्याशिवाय कुठल्याही परिस्थित प्रवेशद्वारातून उठणार नाही, अशी भूमिका घेतल्याने अधिकाऱ्यांची चांगलीच पाचावरधारण बसली. अखेर दिवसभराच्या आंदोलनानंतर निमशिक्षकांच्या आक्रमक भूमिकेपुढे प्रशासनाने नरमाईची भूमिका घेत गुरूवारी प्रत्यक्ष समायोजन घेण्यात येईल, असे लेखी आश्वासन दिले. त्यानंतर रात्री उशिरा निमशिक्षकांनी आपले आंदोलन मागे घेतले.
विज्ञान शिक्षकांच्या पदोन्नतीमुळे सुमारे अडीचशे ते पावणेतीनशे जागा रिक्त झाल्या आहेत. असे असतानाही निमशिक्षकांना नियुक्ती देण्यास जिल्हा परिषद प्रशासनाकडून टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप करीत निमशिक्षकांनी प्रशासनाला सामुहिक आत्मदहनाचा इशारा दिला होता. त्यानुसार मंगळवारी सकाळीच काही निमशिक्ष जिल्हा परिषदेत दाखल झाले होते. निमशिक्षकांची संख्या लक्षात घेता पोलिसांनी तगडा बंदोबस्त तैनात केला होता. दुपारी एक वाजेच्या सुमारा पोलिसांकडून निमशिक्षकांची धरपकड करण्यास सुरूवात केली. जे हाती लागले त्यांना पोलिस व्हॅनमध्ये बसविले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर महिलांसह पुरूष निमशिक्षकांनी थेट जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारातच ठिय्या मांडला. आणि अधिकाऱ्यांवर अक्षरश: आरोपांच्या फैरी झाडण्यास सुरूवात केली. अधिकारी तारीख पे तारीख देत आहेत. ज्या अधिकाऱ्या आमच्या अन्नात माती कालविली, त्यांच्यावर कारवाई व्हावी, अशा शब्दात काही महिलांनी संताप व्यक्त केला. शिक्षणाधिकाऱ्यांसह इतर अधिकाऱ्यांनीही आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्याचा काहीच फायदा झाला नाही. काही केल्या निमशिक्षकांचा संताप कमी होण्याचे नाव घेत नसल्याचे लक्षात आल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद रायते हेही जिल्हा परिषदेत दाखल झाले. त्यांनी निमशिक्षकांसोबत त्यांच्या दालनात अथवा सभागृहामध्ये चर्चेची तयारी दर्शविली. परंतु, आंदोलनस्थळीच चर्चा झाली पाहिजे, अशी भूमिका आंदोलकांनी घेतली. त्यामुळे ही चर्चा झाली नाही.
दरम्यान, निमशिक्षक अधिकाऱ्यांना जुमानत नसल्याचे लक्षात पोलिसांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला. परंतु, तोही निष्पळ ठरला. काही शिक्षक मोठ्या आवाजात पोलिसांचाही रागा आणावर झाला. ‘एकेकाला फोडून काढ’, असे शब्द एका अधिकाऱ्याच्या तोंडून पडल्यानंतर निमशिक्षक प्रचंड संतप्त झाले. ‘फोडून काढायला आम्ही काय गुन्हा केला? आम्ही आमचा न्याय हक्क मागत आहोत. फोडून काढायचेच असेल तर कामचुकार अधिकाऱ्यांना फोडून काढा, अशा शब्दात आंदोलकांनीही उत्तर दिले. निमशिक्षक काही केल्या माघार घेण्यास तयार नसल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिस अधिकाऱ्यांनी महिला कर्मचाऱ्यांसह अधिकची कुमक मागविली. परंतु, निमशिक्षकांनी त्यांची भूमिका सोडली नाही. दरम्यान, पोलिस निमशिक्षकांची समजूत काढीत असतानाच शिक्षणाधिकाऱ्यांनी संबंधित आंदोलन बेकायदेशीर असल्याचे पत्र पोलिसांना दिले. त्यानंतर तर निमशिक्षक अधिकच आक्रमक झाले. ‘आम्हाला जेलमध्ये टाका किंवा आमच्यावर खटले दाखल करा. कसल्याही परिस्थितीत आम्ही आमची भूमिका सोडणार नाही’, असा पवित्रा घेतला. पोलिसांनीही आंदोलकांना घेवून जाण्यासाठी वाहन बोलाविले. त्यामुळे काहीकाळ तणावाचे वातावरण होते. काही प्रमाणात तणावाची परिस्थिती निर्माण झाल्याचे लक्षात आल्यानंतर स्वत: मुख्य कार्यकारी अधिकारी आंदोलनस्थळी येवून ‘निमशिक्षकांनी प्रशासनाला आजवर वेळोवेळी सहकार्य केले असून प्रशासनही त्यांच्या बाजुने आहे. त्यामुळे निमशिक्षकांवर कारवाई करण्यात येवू नये, असे पोलिस प्रशासनाला सांगितले. त्यामुळे पुढील प्रकार टळला. आंदोलक मागे हटण्याच्या परिस्थितीत नसल्याचे लक्षात आल्यानंतर शिक्षणाधिकारी यांनी प्रवेशद्वारात येवून ‘गुरूवारी समायोजनासाठीची समुपदेश प्रक्रिया ठेवण्यात येईल’, अशी ग्वाही दिली. त्यावर निमशिक्षकांनी लेखी पत्राची मागणी केली. त्यानुसार शिक्षणाधिकाऱ्यांनी हे तसे पत्र दिले. हे पत्र हातात पडल्यानंतरच निमशिक्षकांनी आंदोलन मागे घेतले.