अकरा वर्षीय भावाने घोटला ४ वर्षीय चिमुकलीचा गळा!
By Admin | Updated: August 11, 2015 00:59 IST2015-08-11T00:49:35+5:302015-08-11T00:59:51+5:30
बिडकीन : जे वय खेळण्या- बागडण्याचे, मौजमस्ती करण्याचे असते, त्या ११ वर्षीय निरागस वयाच्या मुलाने चक्क सूड भावनेतून आपल्या

अकरा वर्षीय भावाने घोटला ४ वर्षीय चिमुकलीचा गळा!
बिडकीन : जे वय खेळण्या- बागडण्याचे, मौजमस्ती करण्याचे असते, त्या ११ वर्षीय निरागस वयाच्या मुलाने चक्क सूड भावनेतून आपल्या चारवर्षीय चुलत बहिणीचा गळा घोटून खून केला. ही धक्कादायक घटना रविवारी सायंकाळी बिडकीन परिसरातील जैतापूर- पैठणखेडा शिवारात घडली. चुलत्याने दोन वर्षांपूर्वी केलेल्या मारहाणीचा बदला घेण्यासाठीच चुलत बहिणीचा या बालकाने खून केल्याचे तपासात समोर आले आहे. बिडकीन पोलिसांनी या मुलाला ताब्यात घेतले.
शामल कालीस काळे (४) असे खून झालेल्या चिमुकलीचे नाव आहे. घटनेबाबत माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, शामल ही आपल्या आई-वडिलांसोबत जैतापूर शिवारात वस्ती करून राहत होती. बाजूलाच तिचे अन्य दोन चुलते कुटुंबासह राहतात. तिचे वडील आणि आई हे दोघे रविवारी हर्सूल जेलमध्ये अटकेत असलेल्या आपल्या नातेवाईकांची भेट घेण्यासाठी गेलेले होते. त्यामुळे शामल घरी एकटीच होती. सायंकाळी साडेसहाला शामलची आई घरी आली. तेव्हा घरासमोरच्या पलंगावर शामल ही निपचित पडलेली तिला दिसली. आईने तिला उठविण्याचा प्रयत्न केला. ती उठेना. जवळ जाऊन आईने तिला हलविले, तेव्हा तिचा मृत्यू झाल्याचे लक्षात आले. आईने लगेच हंबरडा फोडला. तिचा गळा दाबून खून करण्यात आला असल्याचे दिसून आले. ही माहिती पोलीस पाटलाने बिडकीन ठाण्यात कळविली. माहिती मिळताच उपविभागीय अधिकारी चंद्रकांत अलसटवार, निरीक्षक अनिरुद्ध नांदेडकर, फौजदार गोरख खंडाळकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. रात्री पोलिसांनी पाहणी केली तेव्हा शामलचा गळा दाबून खून करण्यात आलेला असल्याचे आढळून आले.
पोलिसांनी विचारपूस केल्यानंतर त्यावेळी वस्तीवर शामल आणि तिचा अकरा वर्षीय चुलत भाऊच असल्याचे समोर आले. पोलिसांना पाहताच हा चुलत भाऊ गांगरून गेलेला होता. तो घाबरलेला दिसत होता. त्यामुळे पोलिसांना संशय येत होता. अखेर पोलिसांना चिमुकल्या चुलत भावावर आलेला संशय खरा ठरला.
सूडाने पेटला होता चिमुरडा...
दोन वर्षांपूर्वी किरकोळ कारणावरून मयत शामलच्या वडिलांनी तिच्या अकरा वर्षीय चुलत भावाला बेदम मारहाण केली होती. ही मारहाण त्या चिमुरड्याच्या मस्तकात बसली होती.