अ...‘अकरावी’चा!
By Admin | Updated: June 25, 2014 00:38 IST2014-06-25T00:27:39+5:302014-06-25T00:38:42+5:30
श्रीनिवास भोसले, नांदेड दहावी-बारावीच्या निकालानंतर आता प्रवेशाची लगबग सुरू झाली आहे. निकाल लागेपर्यंत निकाल काय लागतो, याची धाकधुक विद्यार्थ्यांना होती़
अ...‘अकरावी’चा!
श्रीनिवास भोसले, नांदेड
दहावी-बारावीच्या निकालानंतर आता प्रवेशाची लगबग सुरू झाली आहे. निकाल लागेपर्यंत निकाल काय लागतो, याची धाकधुक विद्यार्थ्यांना होती़ निकालानंतर आता अॅडमिशन कोणत्या महाविद्यालयात होणार, पाहिजे तो ग्रुप मिळेल की नाही या प्रश्नांचे ओझे विद्यार्थ्यांच्या डोक्यावर आहे़ नांदेडसह परभणी, हिंगोली जिल्ह्यातील विद्यार्थी नांदेडातील यशवंत महाविद्यालय, सायन्स कॉलेज, नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालय, प्रतिभा निकेतन, पीपल्स महाविद्यालयासह व्यावसायिक शिक्षण देणाऱ्या संस्थामध्ये प्रवेशपूर्व नोंदणीसाठी विद्यार्थी-पालक गर्दी करीत आहेत़ बारावी परीक्षेत नांदेडचा निकाल गत चार वर्षापासून उच्चांक गाठत असल्याने शिक्षणासाठी नांदेडात येणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये मोठी वाढ झाली आहे़
शालांत परीक्षेत नांदेड जिल्ह्याचा निकाल ७४़२९ टक्के लागला़ गत वर्षीच्या तुलनेत निकालाची टक्केवारी १८़८९ टक्क्यांनी वाढली आहे़ बारावीमध्ये जिल्ह्याचा निकाल ९० टक्के लागला तर १७ शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे़
बारावी परीक्षेतील नांदेड जिल्ह्याला मिळालेले यश आणि शहरातील यशवंत महाविद्यालय, सायन्स कॉलेजामध्ये विद्यार्थ्यांकडून करून घेतल्या जाणारी मेहनत यामुळे बारावी शिक्षणासाठी नांदेडला पालक प्राधान्य देत आहेत़ त्यातच मेडिकलबरोबर इंजिनिअरिंगसाठी सर्वाधिक विद्यार्थी देणारे शहर म्हणून नांदेडची ओळख निर्माण होत आहे़
नांदेड शहरातील प्रमुख महाविद्यालयात प्रवेशपूर्व नोंदणी तर काही कॉलेजमध्ये प्रत्यक्ष प्रवेश सुरू झाले आहेत़ यशवंत अथवा सायन्स महाविद्यालयात प्रवेश मिळावा म्हणून दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांची लगबग सुरू आहे़ यशवंतमध्ये आॅनलाईन नोंदणी प्रक्रिया तर सायन्स, एनएसबी, प्रतिभा निकेतनमध्ये प्रत्यक्ष नोंदणी प्रक्रिया सुरू आहे़ यशवंत महाविद्यालयात आजपर्यंत ७ हजार विद्यार्थ्यांनी आॅनलाईन नोंदणी केली आहे़ जिनियस बॅचमुळे यशवंतमध्ये सर्वाधिक विद्यार्थी प्रवेश घेवू इच्छितात़ सायन्समध्ये ३१०० तर एनएसबीमध्ये ५०० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून यशवंतमध्ये ८५ टक्के तर सायन्स कॉलेजमध्ये ८० टक्के गुण असलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळण्याची शक्यता आहे़
अकरावीचे अॅडमिशन नाममात्र
बहुतांश विद्यार्थी महाविद्यालयात नाममात्र प्रवेश घेवून खासगी शिकवणीवर भर देत आहेत़ नांदेडमध्ये अकरावी, बारावीचे शिक्षण घ्यायला येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे़ शहरासह ग्रामीण भागातील काही कॉलेजमध्ये प्रवेश घेतल्यानंतर थेट परीक्षेलाच जायची मुभा दिली जाते़ यामुळे विद्यार्थ्यांचा वेळ वाचतो, अशी विद्यार्थी आणि पालकांची धारणा आहे़
प्रत्यक्ष शिक्षण खासगी शिकवणीत
कॉलेजमध्ये शिक्षणाचा दर्जा नाही अशी ओरड करीत हजारो रूपये भरून खासगी शिकवणीकडे जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे़ नांदेडमध्ये अकरावी आणि बारावीच्या शिकवणी घेणारे शेकडो क्लासेस आहेत़
खासगी क्लासेसच्या गुणवत्तेची खात्री करण्याची गरज
खासगी क्लासेसच्या संख्येत प्रचंड मोठी वाढ झाली आहे़ काही क्लासेस संचालक विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यासाठी खोटा निकाल प्रसिद्ध करून विद्यार्थ्यांची फसवणूक करीत असल्याची बाब गतवर्षी उघडकीस आली होती़ यामुळे पालकांनी प्रवेश घेण्यापुर्वी तेथील गुणवत्ता आणि जाहीरातीमध्ये प्रसिद्ध होणाऱ्या निकालाची खात्री करून घेणे गरजेचे आहे़
यशवंतमध्ये गुणवत्तेनुसारच प्रवेश
अकरावी प्रवेशासाठी यशवंत महाविद्यालयाकडून आॅनलाईन नाव नोंदणी महाविद्यालयाच्या संकेतस्थळावर १९ जूनपासून सुरू झाली आहे़ आजपर्यंत ७ हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली़ २८ जूनपर्यंत नोंदणी करता येईल़ यानंतर सर्वसमावेश गुणवत्ता यादी ३० जून रोजी प्रसिद्ध होईल, यावरील आक्षेप त्याच दिवशी़ १ जुलै रोजी गुणवत्ता यादी तद्नंतर २ जुलैपासून प्रत्यक्ष प्रवेशास सुरूवात होईल़ गुणवत्ता आणि आरक्षणाच्या निकषावर प्रवेश होतील़ प्राचार्य डॉ़ एऩ व्ही़ कल्याणकर, यशवंत महाविद्यालय
अकरावीला भूकंपशास्त्र विषय
सायन्स कॉलेजमध्ये आजपर्यंत ३१०० विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष नाव नोंदणी केली आहे़ पालकांची होणारी धावपळ आणि अडचण लक्षात घेवून प्रत्यक्ष नोंदणी प्रक्रिया ठेवण्यात आली़ सायन्समध्ये जनरल विषयासह इतर विषयाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे़ यामध्ये प्रामुख्याने भुकंपशास्त्र आणि आयटीचा समावेश आहे़ सर्वसाधारण यादी १ जुलैला प्रसिद्ध होईल़ यानंतर प्रत्यक्ष प्रवेशास सुरूवात होणार आहे़ प्राचार्य डॉ़ जी़एमक़ळमसे, सायन्स कॉलेज