प्रार्थना सुरू असताना तुटून पडली वीज तार
By Admin | Updated: February 8, 2015 00:12 IST2015-02-07T23:49:23+5:302015-02-08T00:12:12+5:30
कडा : आष्टी तालुक्यातील धामणगाव येथील इंदिरा कन्या शाळेत प्रार्थना संपत असताना शनिवारी मुख्य विद्युत वाहिनीची तार तुटून मोठा आवाज झाला.

प्रार्थना सुरू असताना तुटून पडली वीज तार
कडा : आष्टी तालुक्यातील धामणगाव येथील इंदिरा कन्या शाळेत प्रार्थना संपत असताना शनिवारी मुख्य विद्युत वाहिनीची तार तुटून मोठा आवाज झाला. या आवाजामुळे सतर्क होऊन शिक्षक व विद्यार्थ्यांनी वर्गाकडे पळ काढल्यामुळे जीवित हानी झाली नाही. मात्र धावपळीत तीन विद्यार्थिनी जखमी झाल्या.
शुभांगी चौधरी, आरती झिंजुर्के व रूपाली महाजन अशी त्या जखमींची नावे आहेत. धामणगाव येथील इंदिरा कन्या शाळेच्या आवारातून ३३ के.व्ही. उपकेंद्रांतर्गत धामणगाव ते सांगवी पाटण गावाला जोडणारी ११ के.व्ही.ची मुख्य वीज वाहिनी गेली आहे. सकाळी ९.३५ च्या सुमारास राष्ट्रगीत संपण्याच्या क्षणाला स्पार्र्कींेग झाली. यामुळे शिक्षक व विद्यार्थी घाबरले. तार अंगावर पडेल अशी शक्यता निर्माण झाल्यामुळे शिक्षकांनी विद्यार्थ्यांना सतर्क करून वर्गात पळण्याचा सल्ला दिला. यामुळे एकच गोंधळ उडाला. सगळे विद्यार्थी वर्गात पळताना तीन मुली खाली पडल्या व त्या किरकोळ जखमी झाल्या. वेळीच सतर्कता घेतल्यामुळे मोठा अनर्थ टळला. तार पडल्यानंतर वीज प्रवाह सुरूच होता. याची माहिती तात्काळ महावितरणला देण्यात आल्यानंतर तो बंद करण्यात आला.
आष्टी महावितरणचे अधिकारी मदन देशपांडे म्हणाले, आष्टी तालुक्यातील ३३ के.व्ही. उपकेंद्रानुसार कनिष्ट अभियंत्याची बैठक घेऊन शाळांची माहिती घेतली जाईल. मुख्य विद्युत वाहिनीला गार्र्डींगची व्यवस्था करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. (वार्ताहर)