शहरी भागातील ७४७ ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित
By Admin | Updated: August 15, 2014 00:06 IST2014-08-14T23:58:32+5:302014-08-15T00:06:36+5:30
नांदेड :महावितरणच्या नांदेड शहर विभागात थकबाकीदार ग्राहकांविरुद्ध मोहीम राबविण्यात येत असून ४ आॅगस्टपासून सुरु झालेल्या या मोहिमेत ७४७ ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे.

शहरी भागातील ७४७ ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित
नांदेड :महावितरणच्या नांदेड शहर विभागात थकबाकीदार ग्राहकांविरुद्ध मोहीम राबविण्यात येत असून ४ आॅगस्टपासून सुरु झालेल्या या मोहिमेत ७४७ ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याबरोबरच वीज चोरी करणाऱ्या ग्राहकावरही कारवाई करण्यात येत आहे. या मोहिमेत १८१ वीज चोरीचे प्रकार उघडकीस आले आहेत. त्यांच्याविरुद्ध पोलिसांत गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
नांदेड शहरात ग्राहकांकडे वाढलेली थकबाकी कमी करुन वीज हानी कमी करण्यासाठी मुख्य अभियंता आर. जी. शेख आणि अधीक्षक अभियंता डी. डी. हामंद यांच्या सुचनेनुसार शहरी विभागाचे कार्यकारी अभियंता डी. एच. अग्रवाल यांनी ही मोहीम सुरु केली आहे. या मोहिमेत २२ पथके कार्यान्वित असून एका पथकात शहर विभागाचा एक सहायक अभियंता आणि इतर विभागातील एक सहायक अभियंता यांच्यासह चार जनमित्रांचा समावेश आहे.
नांदेड शहर विभागात ४ हजार रुपयांपेक्षा अधिक थकबाकी असणाऱ्या ग्राहकांची संख्या १० हजार ३३७ इतकी असून त्यांच्याकडे १०.७६ कोटी रुपयांची थकबाकी आहे. ४ आॅगस्टपासून २२ पथकांनी ६२५ ग्राहकांचा वीजपुरवठा तात्पुरत्या स्वरुपात खंडित केला आहे. त्यांच्याकडे ७८.५७ लाखांची थकबाकी आहे.
१२२ ग्राहकांचा वीजपुरवठा कायम स्वरुपात खंडित करण्यात आला असून त्यांच्याकडे १९.७४ लाख रुपयांची थकबाकी आहे. या मोहिमेच्या काळात थकबाकीदार ग्राहकांच्या दारात वीजपुरवठा खंडित करण्यास गेले असता १८८० ग्राहकांनी १ कोटी २ लाख रुपयांचा भरणा करुन वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई टाळली.
ही मोहीम पुढील काळातही चालूच राहणार असून ग्राहकांनी वापरलेल्या विजेचे पैसे भरुन महावितरणला सहकार्य करावे व वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई टाळावी, असे आवाहन मुख्य अभियंता आर. जी. शेख यांनी केले आहे. (प्रतिनिधी)