वीज प्रश्नी दिंद्रूडमध्ये अभियंत्याला घेराव
By Admin | Updated: October 17, 2014 00:28 IST2014-10-17T00:07:23+5:302014-10-17T00:28:05+5:30
दिंद्रूड : नेहमीच खंडित होणारा वीजपुरवठा आणि अधिकाऱ्यांकडून होत असलेले दुर्लक्ष याच्या विरोधात गुरूवारी दिंद्रूड ग्रामस्थ आक्रमक झाले होते़

वीज प्रश्नी दिंद्रूडमध्ये अभियंत्याला घेराव
दिंद्रूड : नेहमीच खंडित होणारा वीजपुरवठा आणि अधिकाऱ्यांकडून होत असलेले दुर्लक्ष याच्या विरोधात गुरूवारी दिंद्रूड ग्रामस्थ आक्रमक झाले होते़ शेकडो ग्रामस्थांनी येथील वीज उपकेंद्रावर मोर्चा काढून संताप व्यक्त करीत अभियंत्याला घेराव घातला़ यावेळी पोलिसांना पाचारण करण्यात आले होते़
माजलगाव तालुक्यातील दिंद्रूड येथील ३३ केव्ही उपकेंद्रांतर्गत अनेक वाड्या-वस्त्यांसह गावांचा समावेश आहे़ मात्र मागील काही दिवसापासून या उपकेंद्रातून व्यवस्थीत वीजपुरवठा होत नसल्याने ग्रामस्थ व शेतकरी वैतागले होेते़ तसेच महिन्याला येथील रोहित्र जळत असल्याने अनेक दिवस वीजपुवठा खंडीत राहतो़ असा प्रकार नेहमीच घडत असतानाही याकडे येथील अभियंता दुर्लक्ष करीत असल्याने गुरूवारी ग्रामस्थ आक्रमक झाले होते़ लाईनमनही उपलब्ध नसल्याने खाजगी व्यक्तीकडून विजेची दुरूस्ती करून घ्यावी लागते़ गुरूवारी असाच प्रकार घडल्यानंतर ग्रामस्थ, व्यापारी व शेतकऱ्यांनी कार्यालयावर मोर्चा काढून अभियंत्याला घेराव घातला़ कनिष्ठ अभियंता एम़ आय़ आलवने, उपकार्यकारी अभियंता मंगेश बोरगावकर यांची उपस्थिती होती़ सहायक पोलिस निरीक्षक राकेश चौधरी यांच्यासह पोलीस कर्मचारी तळ ठोकून होते़ बोरगावकर यांच्या लेखी आश्वासनानंतर ग्रामस्थांनी माघार घेतली़ प्रश्न मार्गी न लागल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे़ (वार्ताहर)