वीज कंपनीला ‘झटका’
By Admin | Updated: March 23, 2016 01:05 IST2016-03-23T00:50:03+5:302016-03-23T01:05:51+5:30
उस्मानाबाद : तालुक्यातील भिकार सारोळा येथील शेतकऱ्याने कनेक्शनसाठी पैसे भरले. परंतु, जोडणी मिळाली नाही. हा प्रकार वीज कंपनीच्या अंगाशी आला आहे.

वीज कंपनीला ‘झटका’
उस्मानाबाद : तालुक्यातील भिकार सारोळा येथील शेतकऱ्याने कनेक्शनसाठी पैसे भरले. परंतु, जोडणी मिळाली नाही. हा प्रकार वीज कंपनीच्या अंगाशी आला आहे. राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाने संबंधित शेतकऱ्यास ४ लाख ३२ हजार रूपये दण्याचे आदेश वीज कंपनीला दिले आहेत. या निर्णयामुळे शेतकऱ्याला दिलासा मिळाला आहे.
उस्मानाबाद तालुक्यातील भिकार सारोळा येथील शेतकरी प्रकाश केरबा राऊत यांनी मुरूड शिवारातील जलस्त्रोतासाठी ७०५ एच.पी.ची वीजजोडणी देण्यात यावी, असा मागणी अर्ज वीज कंपनीकडे १७ फेब्रुवारी २००९ मध्ये सादर केला होता. त्यानंतर ३ मार्च २००९ रोजी कोटेशनचा भरणाही केला होता. परंतु, वीज कंपनीकडून काहीकेल्या कनेक्शन मिळाले नाही. वारंवार पाठपुरवा करूनही काहीच फायदा न झाल्यामुळे अखेर राऊत यांनी जिल्हा ग्राहक मंच लातून येथे तक्रार दाखल केली. दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर विद्युत कनेक्शन देण्यास विलंब केल्यामुळे महावितरण कंपनीने शेतकऱ्यास प्रतिदिन १ हजार रूपये दंड या प्रमाणे ४३२ दिवसांचे ४ लाख ३२ हजार रूपये देण्याचे आदेश दिले. परंतु, महावितरण कंपनीने राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग, औरंगाबाद यांच्याकडे अपील दाखल केले. सदरील अपिलावर सुनावणी झाल्यानंतर १५ फेब्रुवारी २०१६ रोजी हे प्रकरण निकाली काढत वीज कंपनीचे अपील फेटाळून संबंधित तक्रारदार शेतकऱ्यास ४ लाख ३२ हजार रूपये व्याजासह देण्याचे आदेश दिले, अशी माहिती अॅड. एन. बी. जाधव यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. तक्रार निवारण आयोगाच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यास दिलासा मिळाला आहे. (प्रतिनिधी)