वीज कंपनी कार्यालय, कर्मचारी वसाहत समस्यांच्या विळख्यात
By Admin | Updated: May 17, 2014 00:17 IST2014-05-16T23:47:29+5:302014-05-17T00:17:40+5:30
उमरगा : वीज महावितरण कार्यालयाच्या परिसरात कर्मचारी वसाहतीची दुरवस्था, सुविधांचा अभाव निर्माण झाल्याने इतरांना प्रकाश देणारे कार्यालय समस्यांच्या विळख्यात सापडले आहे.

वीज कंपनी कार्यालय, कर्मचारी वसाहत समस्यांच्या विळख्यात
उमरगा : संपूर्ण तालुक्यात वीज पुरवठा करणार्या येथील वीज महावितरण कार्यालयाच्या परिसरात कर्मचारी वसाहतीची दुरवस्था, परिसर स्वच्छता, घाणीचे साम्राज्य इत्यादी सुविधांचा अभाव निर्माण झाल्याने इतरांना प्रकाश देणारे वीज कंपनीचे कार्यालय समस्यांच्या विळख्यात सापडले आहे. येथील राष्ट्रीय महामार्गालगत गेल्या २५ वर्षांपासून वीज वितरण कंपनीचे स्वतंत्र कार्यालय कार्यरत आहे. या कार्यालयाकडे संबंधितांनी पाठ फिरविल्यामुळे या कार्यालयामध्ये कार्यालयाच्या परिसरात विविध सुविधांचा अभाव निर्माण झाला आहे. कार्यालयाच्या परिसरात वाढलेली झाडे-झुडपे, अस्ताव्यस्त पडलेले साहित्य, कर्मचारी निवासस्थानांची दुरावस्था, परिसर स्वच्छता, धूळ खात पडलेली वाहने इत्यादी समस्यांच्या विळख्यात कार्यालयाचा परिसर व्यापून गेला आहे. दरम्यान, ग्रामीण भागात विजेचे साहित्य पोहोचविण्यासाठी कधी एकेकाळी खरेदी करण्यात आलेल्या दोन मालट्रक गेल्या अनेक दिवसांपासून कार्यालयाच्या प्रांगणात धूळ खात पडून आहेत. सदरच्या ट्रकची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे लाखो रुपये खर्च करून उपलब्ध केलेले हे साहित्य निकामी होऊ लागले असून या शासकीय संपत्तीचे काय? असा सवाल नागरिकांतून उपस्थित केला जात आहे. दरम्यान, येथील कार्यालयीन कर्मचारी व विद्युत ग्राहकांच्या सुविधेसाठी कार्यालयाच्या पाठीमागील बाजूस स्वच्छतागृहाची उभारणी करण्यात आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या स्वच्छतागृहाचा वापर बंद असल्याने कार्यालयाच्या परिसरात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे याचा कर्मचार्यांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होण्याची शक्यता आहे. निवासस्थाने वापराबाहेर वीज कंपनीच्या कर्मचार्यांसाठी कार्यालयाच्या परिसरात कर्मचारी निवासस्थाने उभारण्यात आली आहेत. या कर्मचारी निवासस्थानांची दुरवस्था झाली आहे. निवासस्थानांची दारे, खिडक्या, छतांची पडझड झाली. त्यामुळे या निवासस्थानांमध्ये कर्मचार्यांना जीव मुठीत धरुन वास्तव्य करावे लागत आहे. याबाबत अनेकवेळा तक्रारी करुनही सदरील निवासस्थानाची दुरुस्ती हाती घेण्यात आलेली नाही, अशी खंत काही जणांनी व्यक्त केली आहे. तसेच सदरील निवासस्थांनाची तातडीने दुरुस्ती हाती घ्यावी, अशी मागणीही कर्मचार्यांच्या वतीने करण्यात आली आहे. (वार्ताहर) भंगार वस्तूंनी परिसर व्यापला विद्युत कंपनीच्या कार्यालयीन कामकाजासाठी दोन इमारतींची उभारणी करण्यात आली आहे. मुख्य इमारतीच्या शेजारी असलेल्या इमारतीची दुरवस्था झाली असून, इमारतीच्या परिसरात घाणीचे साम्राज्य व भंगारातील वस्तूंनी संपूर्ण परिसर व्यापला आहे. ही इमारत वापराविना धूळ खात पडून आहे. या कार्यालयाच्या कामकाजासाठी एकूण १०९ कर्मचारी कार्यरत आहेत. तालुक्यात वाढत चाललेला वीज ग्राहकांच्या तुलनेत कर्मचार्यांची कमतरता भासत असून, अपुर्या कर्मचार्यांवर उपलब्ध कर्मचार्यांवर अतिरिक्त कामाचा ताण सहन करावा लागत आहे. पिण्याचे पाणी, परिसर स्वच्छता, कर्मचार्यांनी कमतरता, विद्युतबिलांची थकबाकी इत्यादी समस्यांच्या विळख्यात हे कार्यालय सापडले आहे.