शहरातील विजेचे तीन महिन्यांनी पुन्हा खाजगीकरण?

By Admin | Updated: November 27, 2014 01:10 IST2014-11-27T01:07:21+5:302014-11-27T01:10:40+5:30

औरंगाबाद : शहर आणि परिसरातील वीज बिल वसुलीसाठी तीन महिन्यांनी पुन्हा एक खाजगी कंपनी अवतरणार असून या कंपनीला योग्य ‘ग्राऊंड’ तयार

Electricity again in the city after three months? | शहरातील विजेचे तीन महिन्यांनी पुन्हा खाजगीकरण?

शहरातील विजेचे तीन महिन्यांनी पुन्हा खाजगीकरण?


औरंगाबाद : शहर आणि परिसरातील वीज बिल वसुलीसाठी तीन महिन्यांनी पुन्हा एक खाजगी कंपनी अवतरणार असून या कंपनीला योग्य ‘ग्राऊंड’ तयार करून देण्याच्या उद्देशाने महावितरणने वीज बिल वसुलीची जोरदार मोहीम सुरू केली असल्याची माहिती महावितरणमधील सूत्रांनी दिली.
शहरातील नागरिकांना अव्वाच्या सव्वा वीज बिले देऊन छळणाऱ्या जीटीएलने आपला गाशा गुंडाळला. जीटीएलमध्ये पूर्वी काम करीत असलेल्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नागरिकांकडे मोठी थकबाकी दर्शविण्यात येत असली तरी ती कंपनी जाताना मोठ्या फायद्यातच राहिली आहे. जीटीएलने मागील तीन- चार महिन्यांपासूच गाशा गुंडाळण्याची तयारी केली होती. त्यामुळे अनेक नागरिकांना जास्तीची बिले धाडल्याच्या तक्रारी आहेत.
या बिलांबाबतच्या तक्रारी जीटीएलने घेतल्या. मात्र, त्यांचे निराकरण केले नाही. सदोष मीटर, जास्तीची बिले लावणे, बिलाबाबतीतले वाद न सोडविणे, असे प्रकार जाता जाता जीटीएलने केले आहेत. यामुळे अनेक नागरिकांनी वीज बिले भरलेले नाही. शहरातील नागरिकांकडे जीटीएलची वीज बिलांची सुमारे १५० कोटी रुपये थकबाकी असल्याचे महावितरणतर्फे सांगण्यात येते. प्रत्यक्षात हा आकडा १३४ कोटी रुपयांचा आहे, असे महावितरणमधील कर्मचारी सांगतात.
एवढी मोठी असणारी ही थकबाकी तीन महिन्यांच्या आत वसूल करण्याचे मोठे आव्हान महावितरणसमोर आहे. त्यामुळे महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी वसुलीसाठी नागरिकांकडे तगादा लावला आहे.
सदोष मीटर किंवा अव्वाच्या सव्वा वीज बिलाची वसुली महावितरणचे कर्मचारी करू पाहत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत.
आगामी तीन महिन्यांच्या काळात जीटीएलच्या जागी दुसरी खाजगी कंपनी येणार असल्याचे महावितरणचे कर्मचारीच ठामपणे सांगतात. त्या कंपनीच्या अटीनुसार नागरिकांकडे असणारी बिले पूर्णपणे वसूल होणे आवश्यक आहे. ‘शून्य थकबाकी’ या अटीवरच नवीन कोणतीही कंपनी येणार असून त्यादृष्टीने ‘ग्राऊंड’ तयार करून देण्याची जबाबदारी महावितरणने उचलली आहे. यामुळे नागरिकांचे वीज कनेक्शन कापण्याची तयारी महावितरणने केली आहे. ४
काही नागरिकांकडे एकापेक्षा जास्त मीटर आहेत. यापैकी काही मीटरचे रीडिंग अधिक येत असल्याच्या तक्रारी आहेत. त्याबाबतची तक्रार करणारी निवेदनेही नागरिकांनी जीटीएलला दिलेली आहेत.
४मात्र, आता पुन्हा आलेले महावितरण सदोष मीटर असणाऱ्या ग्राहकांकडूनही जीटीएलने लावलेली रक्कम वसूल करू पाहत आहे, त्यामुळे महावितरणविरुद्धही नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. ४
सुमारे दीडशे कोटींची ही थकबाकी अर्थातच फुगलेला आकडा असल्याचे आता महावितरणचे कर्मचारी मान्य करीत आहेत. जीटीएलने अधिक फायद्यासाठी अव्वाच्या सव्वा बिले लावल्याची नागरिकांची तक्रार आहे.
४अर्थात, वीज बिलाच्या वसुलीचे अवघड काम महावितरणने करायचे आणि पुन्हा तीन महिन्यांनंतर खाजगी कंपनीने ताबा घ्यायचा यामुळेही महावितरण कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष आहे.
वीज बिल वसुलीवर ‘इन्सेन्टिव्ह’ (विशेष भत्ता) मिळावा, असे कर्मचाऱ्यांना वाटत आहे. नागरिकांकडील थकबाकीपैकी सुमारे ३० ते ४० टक्के वीज बिल अधिकचे लावलेले असल्याच्या तक्रारी आहेत.

Web Title: Electricity again in the city after three months?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.