अजिंठ्यासह २४ गावांत ३२ तासांपासून वीज गुल
By Admin | Updated: July 24, 2014 00:39 IST2014-07-24T00:24:08+5:302014-07-24T00:39:15+5:30
अजिंठा : अजिंठा परिसरात दोन दिवसांपासून रिमझिम पाऊस पडत असून यामुळे सूर्यदर्शन झाले नाही. २४ गावात ३२ तासांपासून वीजही नाही.

अजिंठ्यासह २४ गावांत ३२ तासांपासून वीज गुल
अजिंठा : अजिंठा परिसरात दोन दिवसांपासून रिमझिम पाऊस पडत असून यामुळे सूर्यदर्शन झाले नाही. २४ गावात ३२ तासांपासून वीजही नाही.
या पावसामुळे जमिनीचे पोट भरले असले तरी नदी-नाले अजून कोरडेच आहेत. मंगळवारी दुपारपासून पावसाला सुरुवात झाली. रात्री ११ वाजता वारा व पावसामुळे वीज गुल झाली. बुधवारी दिवसभर वीज कर्मचारी बिघाड बघत फिरत होते. दुपारी त्यांना बिघाड कळला; मात्र पाऊस सुरू असल्याने कर्मचाऱ्यांना खांबावर चढता आले नाही. यामुळे मंगळवारी रात्रभर व बुधवारी रात्रभर वीज गुल होती.
अजिंठा शिवनासह २४ गावांचा वीजपुरवठा खंडित झाला आहे. अजिंठा घाटात तारा तुटल्या. पाऊस उघडताच युद्धपातळीवर काम करून वीजपुरवठा सुरळीत करण्यात येईल, अशी माहिती कनिष्ठ अभियंता राजपूत यांनी दिली. (वार्ताहर)
पावसामुळे माळवदाची घरे गळू लागली
वडोदबाजार : रिपरिप पावसामुळे गावातील माळवदाची घरे गळू लागल्याने ग्रामस्थांची एकच धांदल उडाली. दोन दिवसांपासून सतत भीजपाऊस पडत असल्याने माळवदाच्या घरांना पाण्याचा टपका लागला आहे. त्यामुळे अनेक जण हैराण झाले आहेत. घरांना पाण्याचा लागलेला टपका रोखण्यासाठी घरांच्या छतावर मेनकापड अंथरले जात आहे. गावातील दुकानात मेनकापडाची विक्री वाढली आहे. अडगळीला पडलेल्या छत्र्या, रेनकोट व गरम कपडेही पावसामुळे नागरिकांनी बाहेर काढली आहेत.