विद्यार्थ्यांनी बनविले वीज निर्मिती करणारे यंत्र
By Admin | Updated: June 14, 2016 23:57 IST2016-06-14T23:38:51+5:302016-06-14T23:57:30+5:30
औरंगाबाद : विजेची टंचाई दिवसेंदिवस वाढत चालली आहे.

विद्यार्थ्यांनी बनविले वीज निर्मिती करणारे यंत्र
औरंगाबाद : विजेची टंचाई दिवसेंदिवस वाढत चालली आहे. यासाठी निसर्गत:च मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असणाऱ्या ‘हवा’ आणि ‘सूर्यप्रकाश’ या नैसर्गिक स्रोतांचा उपयोग करून त्यापासून वीजनिर्मिती करणारे यंत्र बनविण्याचा अनोखा प्रयोग एमआयटी महाविद्यालयातील काही विद्यार्थ्यांनी केला आहे.
बालाजी जगताप, अविनाश घोडके, स्वरूप देशमुख, पवनसिंह कच्छवे, विपुल कुलकर्णी या विद्यार्थ्यांनी हा प्रयोग केला. हे विद्यार्थी अभियांत्रिकीच्या यांत्रिकी शाखेत शेवटच्या वर्गात आहेत. याविषयी हे विद्यार्थी म्हणाले की, सर्वत्र विजेचा तुटवडा जाणवतो. त्यामुळे हवा आणि सौर ऊर्जेचा वापर करून स्वस्तात वीज निर्मिती करणारे हे यंत्र बनविण्याचे ठरवले.
या यंत्राचा वापर घर, कार्यालय, महाविद्यालये यासारख्या अनेक ठिकाणी करता येतो. घराच्या छतावर हे मॉडेल बसवता येते. यासाठी जागादेखील अत्यंत कमी लागते. या यंत्रासाठी एक हवेवर फिरणारे ब्लेड, सौर ऊर्जेचे पॅनल, वीज साठवण्यासाठी बॅटरीचा वापर करण्यात आला आहे.
हवेमुळे ही ब्लेड कायम फिरते, त्यामुळे त्याच्या गतीपासून वीजनिर्मिती होते. तसेच सौरऊर्जेमुळेही वीज निर्मिती होते. हे यंत्र बनविण्यासाठी त्यांना अत्यंत कमी खर्च आला. सध्या या यंत्राद्वारे सहा व्हॅटचा बल्ब अहोरात्र चालू शकतो. भविष्यात या यंत्रात सुधारणा करून आणि अजून नवीन तंत्रज्ञान वापरून एका घराला लागणारी वीज निर्मिती सहज होऊ शकते, असा विश्वास या विद्यार्थ्यांनी व्यक्त केला. त्यांना डॉ. प्रा. वि. बी. पानसरे, डॉ. प्रा. ए. टी. औटी आदींचे मार्गदर्शन लाभले.
‘प्रयोग माझा’
विद्यार्थी मित्रांनो तुम्हीही असे काही नवीन प्रयोग, यंत्र तयार केले असतील, तर तुमच्या या प्रयोगांचे स्वागतच आहे. तुमच्या नवनवीन प्रयोगांना या सदरातून प्रसिद्धी दिली जाईल. यासाठी लोकमत भवन, जालना रोड, औरंगाबाद येथे संपर्क साधावा.