वीज गळती ४५% वर
By Admin | Updated: June 12, 2016 00:05 IST2016-06-12T00:01:59+5:302016-06-12T00:05:01+5:30
सुनील कच्छवे, औरंगाबाद सदोष यंत्रणा आणि वीज चोरीमुळे महावितरण कंपनीची शहरातील वीज गळती लक्षणीयरीत्या वाढली आहे. वीज गळतीचे प्रमाण तब्बल ४५ टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे.

वीज गळती ४५% वर
सुनील कच्छवे, औरंगाबाद
सदोष यंत्रणा आणि वीज चोरीमुळे महावितरण कंपनीची शहरातील वीज गळती लक्षणीयरीत्या वाढली आहे. वीज गळतीचे प्रमाण तब्बल ४५ टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. त्यामुळे कंपनीने वीज गळती कमी करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे. शहरातील निम्म्या फिडरवर कंपनीच्या पथकांकडून तपासणी अभियान राबविले जात आहे. गळतीच्या या वाढलेल्या प्रमाणामुळे संपूर्ण शहरावर लोडशेडिंगचे संकट येऊ शकते.
शहरात महावितरण कंपनीचे ८६ फिडर आहेत. या सर्व फिडरवरील वीज ग्राहकांची एकूण संख्या ३ लाख ८० हजार इतकी आहे. यामध्ये घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक स्वरुपाच्या ग्राहकांचा समावेश आहे.
परंतु गेल्या काही दिवसांत शहरात वीज गळतीचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. आता तर ही वीज गळती विक्रमी स्तरावर जाऊन पोहोचली आहे. काही वर्षांपूर्वी शहरात वीज गळतीचे प्रमाण २० ते २५ टक्के होते. मात्र आता ते ४५ टक्केझाले आहे. या गळतीत लाईन लॉसबरोबरच वीज चोरीचे प्रमाणही मोठे आहे. परिणामी महावितरण कंपनीला दर महिन्याला कोट्यवधी रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे.
जुन्या शहरातील काही फिडरवर ही गळती अगदी ६० टक्क्यांपर्यंत गेली आहे. जुन्या शहरात म्हणजे विभाग क्रमांक-१ मध्ये ५० फिडर आहेत. त्यातील २४ फिडरवर सर्वाधिक वीज चोरी आहे. त्याप्रमाणे विभाग क्रमांक-२ मध्येही ३६ पैकी १० फिडरवर वीज गळतीचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढले आहे. आजघडीला शहरात एकूण ४५ टक्के इतकी वीज गळती होत आहे. आतापर्यंतचा विचार करता वीज गळतीचे हे प्रमाण सर्वाधिक आहे. त्यामुळे आता कंपनीने वीज चोरी रोखण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे. वीज चोरी थांबविण्यासाठी शहरात दहा भरारी पथकांची स्थापना करण्यात आली आहे. या पथकांमार्फत अचानक पाहणी करण्यात येत आहे.
लोडशेडिंगचाही धोका...
औरंगाबाद शहर सहा वर्षांपूर्वीच भारनियमनमुक्त घोषित करण्यात आलेले आहे; परंतु आता वीज गळतीचे प्रमाण वाढल्यामुळे लोडशेडिंगचा धोकाही वाढला आहे. महावितरणच्या धोरणानुसार गळतीचे प्रमाण वाढलेल्या भागात लोडशेडिंग केली जाते.
आता शहरातील वीज गळती विक्रमी वाढल्याने पुन्हा लोडशेडिंग लागू होण्याची शक्यताही सूत्रांनी व्यक्त केली.