निवडणुकीची ‘राडेबाजी’ सुरू!
By Admin | Updated: March 17, 2015 00:50 IST2015-03-17T00:39:33+5:302015-03-17T00:50:23+5:30
औरंगाबाद : विद्यानगर वॉर्डातून आपल्या विरोधात मनपा निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवाराच्या घरावर सेनेचे शहरप्रमुख तथा नगरसेवक राजू वैद्य व त्यांच्या सहकाऱ्यांनी हल्ला केला.

निवडणुकीची ‘राडेबाजी’ सुरू!
औरंगाबाद : विद्यानगर वॉर्डातून आपल्या विरोधात मनपा निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवाराच्या घरावर सेनेचे शहरप्रमुख तथा नगरसेवक राजू वैद्य व त्यांच्या सहकाऱ्यांनी हल्ला केला. ‘तू माझ्या विरोधात या वॉर्डातून तयारी का करतोस’ असे म्हणत वैद्य व त्यांच्या कार्यकर्त्यांनी या इच्छुकाच्या घराच्या काचा फोडल्या. त्याला शिवीगाळ करून मारहाण केली. ही घटना रविवारी मध्यरात्री विद्यानगरात घडली. या प्रकरणी राजू वैद्य, संतोष पाटील, लुंगारे यांच्यासह सात जणांविरुद्ध मुकुंदवाडी ठाण्यात दंगलीचा गुन्हा नोंदविण्यात आला. या घटनेवरून मनपा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वी शहरातील निवडणुकीचे वातावरण किती तापले आहे, हे दिसून येते.
घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार सेनेचे शहरप्रमुख तथा क्रांतीचौकचे नगरसेवक राजू वैद्य यांचा वॉर्ड महिलांसाठी आरक्षित झाला आहे.
राजू वैद्य व त्यांच्या कार्यकर्त्यांनी लक्ष्मीकांत थेटे यांच्या घरी जाऊन धुडगूस घातल्याचे सकाळी समजल्यानंतर भाजप-सेनेच्या नेत्यांकडून हे प्रकरण मिटविण्याचा बराच प्रयत्न झाला.
४तक्रार देण्यासाठी मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात गेलेले थेटे यांना दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी समजूत घालून तक्रार न करण्यासाठी विनंती केली; परंतु थेटे यांनी कुणाचेही ऐकले नाही. शेवटी वैद्य व त्यांच्या सहकाऱ्यांविरुद्ध मुकुंदवाडी ठाण्यात गुन्हा दाखल झालाच. त्यानंतरही सेना-भाजपचे नेते मुकुंदवाडी ठाण्यात तळ ठोकून होते.
माझ्याकडून थेटे यांच्यावर हल्ला करण्याचा कुठलाही प्रकार घडला नाही. या प्रकरणाचे राजकारण करून त्याला वाढविले जात आहे. ते माझे नातेवाईक आहेत. त्यांना मी आजवर अनेकदा मदत केली आहे. असे नगरसेवक राजू वैद्य यांनी सांगितले.