जिल्ह्यातील बाजार समित्यांत निवडणूक अटळ
By Admin | Updated: November 10, 2014 01:15 IST2014-11-09T00:31:04+5:302014-11-10T01:15:58+5:30
जालना : संचालक मंडळांची मुदत संपलेल्या सहकारी संस्थांवर प्रशासकाच्या नियुक्तीसह नव्याने निवडणुकांचा निर्णय सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतल्याने

जिल्ह्यातील बाजार समित्यांत निवडणूक अटळ
जालना : संचालक मंडळांची मुदत संपलेल्या सहकारी संस्थांवर प्रशासकाच्या नियुक्तीसह नव्याने निवडणुकांचा निर्णय सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतल्याने या जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांसह व संचालकांत प्रचंड अस्वस्थता पसरली आहे.
राज्यात नवे सरकार अरुढ झाले आहे. पाठोपाठ या सरकारने अल्पावधीतच काही धक्कादायक असे निर्णय घेतले आहेत. विशेषत: सहकार क्षेत्रातील संचालकांची मुदत संपलेल्या संस्थांवर प्रशासक नियुक्ती पाठोपाठ व निवडणुकांचा कार्यक्रम लावण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला. सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतलेल्या या निर्णयाचे लगेचच साद पडसाद उमटू लागले आहेत. गाव पातळीवरील सोसायट्या, तालुकास्थानांच्या खरेदीविक्री संघांसह, बाजार समित्यांत मोठी खळबळ उडाली आहे.
या जिल्ह्यातील सहकारी संस्थांमधील अरुढ पदाधिकाऱ्यांसह संचालक कमालीचे हादरले आहेत. कारण जिल्ह्यातील जालना कृषी उत्पन्नबाजार समितीसह भोकरदन, अंबड येथील बाजार समित्यांवरील संचालक मंडळाची मुदत अनेक महिन्यापूर्वीच संपली आहे. त्या संचालक मंडळांना पूर्वीच्या सरकारने वारवांर मुदत वाढ दिली. परिणामी बाजार समितीच्या पदाधिकाऱ्यांसह संचालकांना मुदत संपून सुद्धा सत्ता उपभोगता आली.
लोकसभा निवडणुका पाठोपाठ विधानसभा निवडणुकांची आचारसंहिता लागू झाल्यामुळे हे सहकार क्षेत्रातील मात्तबर कमालीचे सुखावले होते. परंतु नव्या सरकारने दिलेल्या तडाख्यानंतर या पदाधिकाऱ्यांसह संचालकांना आता सत्तेवरुन पाय उतार व्हावे लागणार हे स्पष्ट झाले आहे.
सहकार खात्याकडून लवकरच म्हणजेच पुढील आठवड्यातच त्या त्या बाजार समित्यांसह सोसायट्यांवर प्रशासकाची नियुक्ती होईल, असा अंदाज आहे. सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी एकूण १७० बाजार समित्यांपैकी संचालक मंडळांची मुदत संपलेल्या ४५ बाजार समित्यांची यादी मागविली आहे. विशेषत: काँग्रेस आघाडी सरकारने प्रशासक मंडळ नियुक्त केलेल्या समित्यांची यादी प्राधान्याने मागविली असून, त्यामुळे जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील हे मात्तबर चक्रावून गेले आहेत. अंबड, घनसावंगी, मंठा, परतूर येथील बाजार समितीही मात्तबरांच्या ताब्यात आहेत. (वार्ताहर)
या जिल्ह्यात काँग्रेस आघाडीबरोबर आता सत्तारुढ गटांतील म्हणजे भाजपसह शिवसेनेतील मात्तबर पुढाऱ्यांच्या ताब्यात सहकारी संस्था आहेत. जालना बाजार समितीवर माजीमंत्री अर्जुन खोतकर यांचे, भोक रदन बाजार समितीवर केंद्रिय मंत्री रावसाहेब दानवे यांचे वर्चस्व आहे. जालना बाजार समितीच्या निवडणुकां संदर्भात गेल्या काही महिन्यांपूर्वी हालचाली सुरु होत्या. परंतु त्या मंदावल्या. आता नव्या सरकारनेच घेतलेल्या या निर्णयामुळे मराठवाड्यातील सर्वात मोठ्या म्हणजे जालना बाजार समितीच्या निवडणुका होतील अशी चिन्हे आहेत.