पालिकेत अजूनही निवडणूक ज्वर
By Admin | Updated: May 13, 2014 00:57 IST2014-05-13T00:30:25+5:302014-05-13T00:57:39+5:30
औरंगाबाद : लोकसभा निवडणुकीसाठी ५ मार्च रोजी लागलेली आचारसंहिता २६ एप्रिल रोजी शिथिल झाली असली तरी मनपातील अनेक अधिकारी अजून आचारसंहितेच्या अमलाखालीच वावरत आहेत.

पालिकेत अजूनही निवडणूक ज्वर
औरंगाबाद : लोकसभा निवडणुकीसाठी ५ मार्च रोजी लागलेली आचारसंहिता २६ एप्रिल रोजी शिथिल झाली असली तरी मनपातील अनेक अधिकारी अजून आचारसंहितेच्या अमलाखालीच वावरत आहेत. पालिकेत दुपारी ३ ते ५ नागरिकांना भेटण्याच्या वेळेत अधिकारी दांडी मारीत असल्याची ओरड नगरसेवक आणि नागरिकांनी सुरू केली आहे. सोमवार आठवड्याचा पहिला दिवस असतानाही बहुतांश अधिकारी आज पालिकेत फिरकले नाहीत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना हेलपाटे मारावे लागत आहेत. विभागप्रमुख पालिकेत नसल्याचे पाहून कनिष्ठ अधिकारीही दुपारनंतर विभागात फिरकत नाहीत. महिनाभरापासून पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. अवकाळी पावसामुळे अनेक पथदिवे बंद पडले आहेत. ड्रेनेज तुंबले आहेत. या कामांकडे प्रशासन लक्ष देत नाही. आचारसंहिता राजकीय पुढार्यांसाठी असून त्याची अंमलबजावणी कशी केले जाते, यावर देखरेख ठेवण्याची जबाबदारी प्रशासनाची असते. त्यासाठी जिल्हा निवडणूक अधिकार्यांच्या मदतीसाठी स्थानिक स्वराज्य संस्थांमधील काही अधिकार्यांची निवड केली जाते. निवडणुकीची ड्यूटी करणे अधिकार्यांना बंधनकारक असते; परंतु निवडणूक आचारसंहितेच्या काळात मुख्य ड्यूटी करणेही महत्त्वाचे असते. मनपातील अधिकारी मात्र याला अपवाद ठरत आहेत. अनेक अधिकारी मुख्यालयातून दुपारी १ वाजताच गायब होतात. सायंकाळी ५ वाजता ते कार्यालयात परत येतात. नागरिकांच्या समस्या पाणीपुरवठा, ड्रेनेज, रस्ते, पथदिवे या समस्यांकडे दुर्लक्ष करावे, असे आचारसंहितेत कुठेही म्हटलेले नाही. मात्र, पालिकेत नागरिकांच्या या समस्यांकडे कुणी लक्ष देणार की नाही. त्यासाठी प्रशासनाचे नियोजन काय असावे, हे आयुक्त डॉ. कांबळे यांनी ठरविणे गरजेचे आहे. मात्र, सर्व जण स्वत:चे उद्योग सांभाळून पालिकेत नोकरी करीत असल्यामुळे सर्वसामान्यांचे हाल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आयुक्त पुन्हा मुंबईला आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे आज सायंकाळी पुन्हा मुंबईला रवाना झाले आहेत. एका तातडीच्या बैठकीसाठी ते मुंबईला गेल्याचे प्रशासकीय सूत्रांकडून समजले आहे. ११ मार्चपासून आयुक्तांनी सर्व अधिकारी, कर्मचार्यांच्या हजेरीची नोंद घेण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार आस्थापना अधिकारी भालचंद्र पैठणे यांनी उपस्थित अधिकारी, कर्मचार्यांची नोंद घेण्याचा उपक्रम महिनाभर राबविला. त्यानंतर पुन्हा परिस्थिती जैसे थे झाली. परिपत्रक काढू आयुक्तांच्या सूचनेनुसार सर्व अधिकारी, कर्मचार्यांना दुपारी ३ ते ५ या वेळेत पालिकेत थांबण्यासाठी परिपत्रक काढून सूचित करण्यात येईल, असे आस्थापना अधिकारी भालचंद्र पैठणे यांनी सांगितले. काय म्हणतात नगरसेवक नगरसेवक समीर राजूरकर म्हणाले की, आचारसंहिता शिथिल झाली आहे. त्यामुळे अधिकार्यांनी त्यांच्या वेळेत मनपात थांबणे गरजेचे आहे. नगरसेवक बालाजी मुंडे म्हणाले की, हा प्रकार थांबला नाही, तर उद्या १३ रोजी अधिकार्यांच्या दालनाला कुलूप लावण्याचे आंदोलन करण्यात येईल. नगरसेवक बबन नरवडे म्हणाले की, माझ्या वॉर्डातील अनेक कामे ठप्प आहेत. अधिकारी नसल्यामुळे कामे होत नाहीत.