दुष्काळी उकाड्यात इलेक्शन फिव्हर
By Admin | Updated: April 1, 2016 01:10 IST2016-04-01T00:55:40+5:302016-04-01T01:10:34+5:30
लातूर : लातूर जिल्ह्यात तीव्र दुष्काळ असताना जिल्ह्यातील चार संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. निलंगा कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक ३ एप्रिल रोजी होत असून

दुष्काळी उकाड्यात इलेक्शन फिव्हर
लातूर : लातूर जिल्ह्यात तीव्र दुष्काळ असताना जिल्ह्यातील चार संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. निलंगा कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक ३ एप्रिल रोजी होत असून या निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. जिल्हा वकील मंडळाच्या निवडणुकीसाठीही ७ एप्रिल रोजी मतदान होत असून, विद्यमान अध्यक्षांसह विरोधकांची मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ११ ब मध्ये पोटनिवडणूक होत असून, काँग्रेस वगळता सर्वच राजकीय पक्षांचे उमेदवार या निवडणुकीत गुंतले आहेत. जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या निवडणुकीचाही प्रचार व्हॉटस् अॅपवर रंगला आहे.
निलंगा : निलंगा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ संचालकांच्या निवडीसाठी येत्या रविवारी मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी काँग्रेस, भाजप आणि शिवसेनेने स्वतंत्रपणे पॅनल उभे करून शड्डू ठोकले आहेत. वाढत्या उन्हाबरोबर प्रचाराची राळही उडत आहे. त्यामुळे आरोप-प्रत्यारोपांबरोबर कलगीतुरा रंगत आहे.
निलंगा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकांच्या निवडीसाठी तब्बल ३५ वर्षांनी निवडणूक होत आहे. काँग्रेसचे अशोकराव पाटील निलंगेकर, भाजपाचे पॅनल प्रमुख आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्यात जोरदार कलगीतुरा रंगत आहे. काका-पुतण्यांतील आरोप-प्रत्यारोपांमुळे निवडणुकीत चांगलाच रंग भरला आहे. या दोन्ही पॅनलने आपले प्रत्येकी १८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरविले आहेत. त्याचबरोबर शिवसेनेचे लिंबन महाराज रेशमे यांनीही आपले पॅनल उभे केले आहे. रेशमे यांच्या पॅनलला व्यापारी मतदारसंघातून उमेदवार न मिळाल्याने त्यांचे १७ उमेदवार रिंगणात आहेत.
प्रचारासाठी अवघे दोनच दिवस शिल्लक असल्याने काका-पुतण्यांनी मतदारसंघातील ७० गावे पिंजून काढली आहेत. प्रत्येक मतदारांच्या भेटी घेऊन कॉर्नर सभा घेतल्या जात आहेत. निलंगेकर काका-पुतण्यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनविली आहे. दरम्यान, नुकत्याच झालेल्या औराद कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत भाजपाने आपला झेंडा रोवला आहे. निलंगा बाजार समितीवरही भाजपाचा करिष्मा दाखविण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे. (वार्ताहर)
या निवडणुकीसाठी ३ एप्रिल रोजी १२ केंद्रांवर मतदान होणार आहे. यात सोसायटी मतदारसंघात ७६०, ग्रामपंचायत संघात ६२०, व्यापारी १६१, हमाल-मापाडीमधून ४५ मतदार आहेत. जिल्हा परिषद शाळा कासारशिरसी, जि.प. शाळा बामणी, निटूर, निलंगा कृषी उत्पन्न बाजार समिती येथे मतदान होणार आहे. ४ एप्रिल रोजी निलंगा येथील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये मतमोजणी होणार असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी गजेंद्र देशमुख यांनी सांगितले.
शिवसेनेच्या प्रचाराचा गाजावाजा दिसून येत नाही. मात्र मतदारांच्या भेटी-गाठी घेण्यावर भर आहे. आम्ही निवडून नाही आलो तर कोणाचा तरी पराभव करण्यास हातभार लावू, अशी मानसिकता शिवसेनेची मानसिकता आहे.
लातूर : लातूर जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या कार्यकारिणीचा कालावधी १० एप्रिलला संपत असल्याने अनेक इच्छुकांनी गुडघ्याला बाशिंग बांधले आहे. विशेष म्हणजे इच्छुकांचा व्हॉटस् अॅपवर प्रचारही रंगला आहे.
अध्यक्ष व सचिव पदासाठी होत असलेल्या या निवडणुकीसाठी अनेकजण इच्छुक आहेत. त्यांनी मोर्चेबांधणीही केली आहे. विद्यमान अध्यक्ष अशोक चिंचोले, सचिव विजयकुुमार स्वामी, शाम पटवारी, विकास गाढवे, महादेव कुंभार, काकासाहेब गुट्टे यांनी आपली उमेदवारी घोषित केली आहे.
दरम्यान, निवडणूक निर्णय अधिकारी प्रा. विजयकुमार शिंदे यांनी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून, प्रारुप मतदारयादी प्रसिद्ध केली आहे. अर्ज विक्री व स्वीकृती १ ते २ एप्रिल या कालावधीत सकाळी ११ ते ५ या वेळेत होणार आहे. उमेदवारी अर्जांची छाननी ३ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता होणार असून, उमेदवारी अर्जांवरील आक्षेपांवर ३ एप्रिल रोजीच निर्णय होणार आहे. त्यानंतर उमेदवारांना उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी वेळ दिला जाईल आणि ७ एप्रिल रोजी मतदान होणार आहे.