सहकारी संस्थांच्या निवडणुकीचा बिगुल
By Admin | Updated: January 23, 2015 00:55 IST2015-01-23T00:31:19+5:302015-01-23T00:55:43+5:30
हणमंत गायकवाड , लातूर जिल्हा बँकेसह जिल्ह्यातील ४५५ सहकारी संस्थांच्या निवडणुका होणार असून, प्रशासनाने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या असून,

सहकारी संस्थांच्या निवडणुकीचा बिगुल
हणमंत गायकवाड , लातूर
जिल्हा बँकेसह जिल्ह्यातील ४५५ सहकारी संस्थांच्या निवडणुका होणार असून, प्रशासनाने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या असून, ‘ब’ वर्गातील एकूण ६२ पैकी ७ विविध कार्यकारी सोसायटीच्या मतदारांची अंतिम यादी ९ फेब्रुवारीला प्रसिद्ध होणार आहे़ त्यानंतर १५ दिवसात या सोसायटींच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होणार आहे़ ‘क’ गटातील १९६ व ‘ड’ गटातील १०३ संस्थांसाठी प्राधिकृत अधिकारीही नियुक्त केले आहेत.
शिरुर अनंतपाळ येथील विविध कार्यकारी सोसायटी, लातूर येथील विशाल सहकारी सोसायटी, महापूर येथील विविध कार्यकारी सोसायटी, रेणापूर विविध कार्यकारी सोसायटी, निलंगा तालुक्यातील लांबोटा व निटूर विविध कार्यकारी सोसायटी आणि उदगीर तालुक्यातील हेर सोसायटीच्या मतदारांची अंतिम यादी ९ फेब्रुवारी २०१५ रोजी प्रसिद्ध होणार आहे़ मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर १५ दिवसात निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होईल़ जिल्हा बँकेचीही मुदत संपली असून, बँकेचे सभासद असणाऱ्या संस्थांचे ठराव घेण्याचे काम सुरु झाले आहे़ सभासद संस्थांचे ठराव आल्यानंतर मतदारांची अंतिम यादी प्रसिद्ध होऊन निवडणूक कार्यक्रम जाहीर होणार आहे़ लातूर जिल्ह्यात ‘अ’ वर्गातील संस्था ७ आहेत, त्यापैकी २ संस्थांची निवडणूक होणार आहे़ त्यात विकास सहकारी साखर कारखाना आणि जिल्हा बँकेचा समावेश आहे़ तर ‘ब’ वर्गातील ६२ आहेत़ त्यापैकी ७ विविध सेवा सहकारी संस्थांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत़ ‘क’ वर्गात लातूर जिल्ह्यात एकूण १ हजार १०४ संस्था आहेत़ त्यापैकी २०१४ अखेर ३४३ संस्थांच्या संचालक मंडळाची मुदत संपली आहे़ त्यांच्या निवडणुकाही सुरु होत आहेत़ ३४३ पैकी १९६ संस्थांच्या निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत़ ‘क’ वर्गातील लातूर तालुक्यात २२, औसा-७, निलंगा-१२, शिरुर अनंतपाळ-३, उदगीर-१०, जळकोट-७, अहमदपूर-२२, चाकूर-८, रेणापूर-३ संस्थांच्या निवडणुकींचा कार्यक्रम मंजूर झाला आहे़
‘ड’ वर्गात लातूर जिल्ह्यात ९८५ संस्था आहेत़ त्यापैकी १०३ संस्थांवर प्राधिकृत अधिकारी निवडणुकीसाठी नियुक्त केले आहेत़ ७५ संस्थांना विशेष अधिमंडळाच्या सभेची नोटीस काढण्यात आली आहे़ शिवाय ७२ संस्थांच्या अधिमंडळ सभेत निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्या आहेत़ लातूर तालुक्यात १६, निलंगा-४, शिरुर अनंतपाळ -१०, उदगीर-१, जळकोट-७, अहमदपूर-१४, चाकूर-१४, रेणापूर-९ अशा एकूण ७५ संस्थांना अधिमंडळ सभेची नोटीस बजावण्यात आली असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक घोलकर यांनी दिली़ (प्रतिनिधी)