पासपोर्ट हरवल्यामुळे पाकिस्तान जेलमध्ये राहून १७ वर्षांनंतर वृद्ध महिला परतली औरंगाबादला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:21 IST2021-02-05T04:21:00+5:302021-02-05T04:21:00+5:30
हसीनाबीबी यांचे लग्न सहारणपूर येथील शेख दिलशाद अहमद यांच्यासोबत झाले. त्यांच्यासोबत त्या उत्तर प्रदेशमध्ये राहत होत्या. त्यांना मूलबाळ नाही. ...

पासपोर्ट हरवल्यामुळे पाकिस्तान जेलमध्ये राहून १७ वर्षांनंतर वृद्ध महिला परतली औरंगाबादला
हसीनाबीबी यांचे लग्न सहारणपूर येथील शेख दिलशाद अहमद यांच्यासोबत झाले. त्यांच्यासोबत त्या उत्तर प्रदेशमध्ये राहत होत्या. त्यांना मूलबाळ नाही. २००४ साली त्या नातेवाइकांना भेटण्यासाठी रेल्वेने पाकिस्तानला गेल्या होत्या. तेव्हा तेथे त्यांच्या नातेवाइकांची भेट झाली नाही. मात्र, त्यांचा पासपोर्ट हरवला. तेव्हा संशयित म्हणून त्यांना तेथील पोलिसांनी ताब्यात घेतले आणि जेलमध्ये टाकले. तेव्हापासून त्या मायदेशी परत येण्यासाठी प्रयत्न करीत होत्या. २०१९ साली भारत सरकारला तिची माहिती मिळाली आणि तिला परत आणण्याची कार्यवाही सुरू झाली. ती औरंगाबादची असल्याचे सांगत होती. यामुळे औरंगाबाद पोलिसांना तिच्या नातेवाइकांचा शोध घेण्यास सांगण्यात आले. केवळ चेलीपुरा, औरंगाबाद, असा तिचा पत्ता होता. हा भाग सिटीचौक पोलीस ठाण्याच्या हद्दीत येतो. यामुळे सिटीचौक पोलिसांना कामाला लावण्यात आले. हवालदार अजीम इनामदार यांनी तिचे नातेवाईक, तसेच तिच्या नावे असलेली स्थानिक संपत्तीची कागदपत्रे मिळविले आणि ती औरंगाबादची असल्याबाबत शिक्कामोर्तब झाले. शिवाय तिच्या बहिणीची मुलगा खाजा जहिरोद्दीन चिश्ती यांचा शोध घेतला. कागदोपत्री कार्यवाही पूर्ण झाल्यावर २१ डिसेंबर रोजी पाकिस्तानमधून अमृतसर (पंजाब) येथे आली. तेव्हापासून ती रेडक्रॉस सोसायटीच्या ताब्यात होती. तिला घेऊन जाण्याचे निर्देश पोलिसांना प्राप्त झाल्यावर पोलीस निरीक्षक संभाजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार महेबूब महेमूद शेख, महिला पोलीस रइसा जमिरोद्दीन शेख यांनी अमृतसर येथे जाऊन हसीनाबीबी यांना २६ जानेवारी रोजी रात्री ९.३० वाजता रेल्वेने औरंगाबादला आणले.
चौकट
औरंगाबाद पोलिसांचे मानले आभार
हसीनाबीबी यांनी औरंगाबादेत पाय ठेवल्यावर औरंगाबाद पोलिसांचे आभार मानले. यावेळी पोलिसांनी त्यांच्या बहिणीची मुले खाजा जहिरोद्दीन चिश्ती खाजा जकिउद्दीन चिश्ती (रा. रशीदपुरा) यांच्या ताब्यात दिले. याविषयी सिटीचौक पोलिसांनी स्टेशन डायरीत नोंद घेतली.