एकनाथरावांनी लातुरात रोखला होता अजाबळी..!

By Admin | Updated: May 26, 2015 00:48 IST2015-05-26T00:10:48+5:302015-05-26T00:48:05+5:30

हणमंत गायकवाड ,लातूर २३ जुलै २००३ ची गोष्ट. सकाळी ११.३० ची वेळ. अंगावर चाबकाचे फटकारे मारत अन् घुंगराच्या तालावर पोतराजांची यात्रा निघालेली... अंबाजोगाई रोडवरील रेणापूर चौकातून

Eknatharwala was obstructed by the awakening ..! | एकनाथरावांनी लातुरात रोखला होता अजाबळी..!

एकनाथरावांनी लातुरात रोखला होता अजाबळी..!


हणमंत गायकवाड ,लातूर
२३ जुलै २००३ ची गोष्ट. सकाळी ११.३० ची वेळ. अंगावर चाबकाचे फटकारे मारत अन् घुंगराच्या तालावर पोतराजांची यात्रा निघालेली... अंबाजोगाई रोडवरील रेणापूर चौकातून देवीचा नवस फेडण्यासाठी ही यात्रा आर्वीच्या गायरानात जात होती. हलगीचा आवाज ऐकून भरधाव वेगातील स्कॉर्पियोला ब्रेक लागले आणि पोतराज प्रथा निर्मूलन करणारे तथा मानवी हक्क अभियानाचे संस्थापक अ‍ॅड. एकनाथ आवाड पोतराजांच्या यात्रेत घुसले. नव्हे, त्यांनी होऊ घातलेले रेड्याचे ‘कारण’ थांबविले...
राजर्षी शाहू महाविद्यालयात ‘अंधश्रद्धा निर्मूलनासाठी कायद्याची गरज’ या विषयावर परिसंवाद सुरू होता आणि याचवेळी इकडे रेणापूर चौकातून पोतराजांची यात्रा देवीचा नवस फेडायला आर्वीच्या शिवारात वाजत गाजत जात होती. सामाजिक परिवर्तनाची चळवळ गतिमान करणारे आणि फुले-शाहू-आंबेडकरांचा विचार प्रमाण मानणारे मानवी हक्क अभियानचे अध्यक्ष अ‍ॅड. एकनाथ आवाड या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते होते. ‘लसाकम’नेही त्यांचा सत्कार ठेवला होता. या कार्यक्रमाला येताना त्यांना पोतराजांची ही यात्रा दिसली. लागलीच त्यांनी आपली गाडी थांबविली. अन् पोतराजांच्या जथ्यात गेले. ज्यांनी देवीला नवस केला, त्यांच्या जवळ जाऊन म्हणाले, बाबांनो, आपलं दु:ख देवी नाही दूर करू शकत. आपल्या दु:खाचं कारण बाबासाहेबांनी फार पूर्वीच सांगितलं आहे. माझा बापही मांगीरबाबाचा पोतराज होता. पण मी माझ्या बापाचं केसोपन केलं. तरीपण आज मी सुखात आहे. तुमच्यासाठीच लढतो आहे. तुम्हाला सामाजिक न्याय मिळवून देण्याचा माझा प्रयत्न आहे. तुम्ही हे सारे सोडून द्या रे बाबांनो... नवस केलेल्या राजकुमार व शाहुराज कांबळे कुटुंबियांंना ते समजावून सांगत होते. मात्र व्यर्थ. उलट कांबळे कुटुंब त्यांना म्हणाले, आमची लेकरं वाचत नव्हती, तवा तुमचा बाबासाहेब कुठं गेला होता, आम्ही देवीला नवस केला. आमची लेकरं वाचली. म्हणून आम्ही देवीला ‘कारण’ करायला निघालो. साहेब, तुमचा रस्ता धरा. एकनाथ आव्हाडांची काही एक मात्रा चालली नाही. ते थेट गाडीत जाऊन बसले. ब्राझील अन् रशियाला जाऊन काहीच फायदा झाला नाही बाबासाहेब... जागतिक परिषदेत प्रश्न मांडूनही उपयोग झाला नाही बाबासाहेब. किती समजावून सांगू मी या लोकांना... असे मनाशीच पुटपुटले आणि त्यांची गाडी सुसाट वेगाने शिवाजी चौकातील पोलिस ठाण्यात जाऊन थांबली.
पोलिसांत त्यांनी या घटनेची फिर्याद दिली आणि अंनिस आणि लसाकमच्या कार्यक्रमाला हजेरी लावली, तेथे विषयाची मांडणी करतानाही खंत व्यक्त केली. दरम्यान, अंनिसचे कार्याध्यक्ष माधव बावगे यांच्याही कानावर ही गोष्ट गेलेलीच होती. ‘कारण’ आणि ‘नवस’ केलेल्या शाहुराज व राजकुमार कांबळे यांना पुन्हा हे दोघे भेटले. बाबांनो, ही अंधश्रद्धा आहे. या लहान लहान मुलांना तुम्ही आयुष्यभर पोतराज ठेवणार का? तुमची गरिबी असेल तर मी माझ्या संघटनेच्या वतीने मुलांचं शैक्षणिक पुनर्वसन करण्यास तयार आहे. तुम्ही ही अंधश्रद्धा सोडा. मात्र देवीच्या श्रद्धेत कांबळे कुटुंबीय खोलवर गेल्यामुळे आव्हाड, बावगेंचे त्यांनी ऐकले नाही.
शेवटी पोलिसांनी शाहुराज व राजकुमार कांबळे या दोघांसह पोतराजांनाही ताब्यात घेतले. पोलिसांनी त्यांची चौकशी करून रेड्याचं कारण करणार नाही, असे लिहून घेतले. ‘कारण’ थांबले. पण पोतराजांच्या जथ्यात असलेली तीन कोवळी पोरं आयुष्यभर पोतराजच राहणार का ही सल त्यांच्या मनात राहिली...
सावित्रीबाई फुले बेनीफिट फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांच्या भावना अनावर झाल्या. अ‍ॅड. एकनाथ आवाड यांच्या नेतृत्वाखाली या फाऊंडेशनने लातूर जिल्ह्यात ५५० महिला बचत गटांची स्थापना केली असून, ४५५६ महिलांचे संघटन केले आहे. या बचत गटांची महिन्याला १ कोटी ४१ लाखांची उलाढाल असून, शेळीपालन, दुग्ध व्यवसाय, भाजीपाला विक्री, शिवणकला, बांगड्याचा व्यवसाय, मिरची कांडप असे वेगवेगळे व्यवसाय या बचत गटांचे आहेत. अ‍ॅड. एकनाथ आवाड संस्थापक चेअरमन असलेल्या अनिक फायनान्शिअल लि.ने सावित्रीबाई फुले मॅच्युअल बेनीफिट फाऊंडेशनार्फत हे जाळे तयार केले आहे, असे त्यांचे विश्वसनीय कार्यकर्ते बी.पी. सूर्यवंशी यांनी सांगितले.

Web Title: Eknatharwala was obstructed by the awakening ..!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.