नळदुर्ग : विहिरीत पडल्याने बुडून मृत्यू झालेल्या एका ८ वर्षीय शाळकरी मुलीचा मृतदेह बाहेर काढण्यासाठी सहा तास दोन मोटारींनी पाणीउपसा करण्यात आला़ ही घटना गुरूवारी दुपारी गंधोरा (ता़तुळजापूर) शिवारात घडली़मिळालेल्या माहितीनुसार, तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथील पुजारी नगर तांड्यावरील निशा दिनेश राठोड (वय-०८) ही मुलगी इयत्ता दुसरीच्यावर्गात शिक्षण घेत आहे़ निशा राठोड ही गंधोरा येथील नागझरी तांड्यावरील नातेवाईकांकडे गेली होती़ निशा ही गुरूवारी बराचवेळ घरी न आल्याने नातेवाईकांनी तिचा शोध घेतला़ मात्र, ती दिसून आली नाही़ गावच्या शिवारातील बळवंत अंबादास कोनाळे यांच्या विहिरीवर लहान मुलाच्या चप्पला दिसल्या़ ही माहिती मिळाल्यानंतर नातेवाईकांनी विहिरीवर जावून पाहणी केली असता त्या निशाच्या चप्पला असल्याचे दिसून आले़ तहान लागल्याने ती विहिरीत उतरली असावी व तिचा पाय घसरून ती विहिरीत पडल्याने बुडून तिचा मृत्यू झाल्याचा संशय नातेवाईकांना आला़ नागरिकांनी तत्काळ विहिरीवर साडेसात एचपीच्या दोन मोटारी लावून रात्री १२ ते पहाटे ६ वाजेपर्यंत पाण्याचा उपसा केला़ त्यावेळी विहिरीत निशाचा मृतदेह आढळून आला़ या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे़ या प्रकरणी शिवाजी पवार यांनी दिलेल्या माहितीवरून नळदुर्ग पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़ तपास पोहेकॉ पोपलाईत हे करीत आहेत़ (वार्ताहर)
आठ वर्षीय मुलीचा बुडून मृत्यू
By admin | Updated: April 4, 2015 00:33 IST