नळ कनेक्शन देण्यासाठी आठ हजारांची लाच
By Admin | Updated: January 12, 2016 00:06 IST2016-01-12T00:03:45+5:302016-01-12T00:06:53+5:30
औरंगाबाद : अनधिकृत नळ कनेक्शन प्रकरणी फौजदारी कारवाई न करण्यासाठी एकाकडून आठ हजार रुपये लाच घेताना औरंगाबाद

नळ कनेक्शन देण्यासाठी आठ हजारांची लाच
औरंगाबाद : अनधिकृत नळ कनेक्शन प्रकरणी फौजदारी कारवाई न करण्यासाठी एकाकडून आठ हजार रुपये लाच घेताना औरंगाबाद वॉटर युटिलिटी कंपनीच्या कंत्राटदाराच्या समन्वयकाला सोमवारी रंगेहाथ पकडण्यात आले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी सकाळी महापालिका कार्यालयात ही कारवाई केली.
सुबोध बोबडे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याविषयी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक प्रकाश कुलकर्णी यांनी सांगितले की, पाणीपुरवठ्याचा कारभार पाहण्यासाठी बालाजी एजन्सीने सुबोध बोबडेसह कर्मचारी औरंगाबाद युटिलिटी कंपनीला पुरविलेले आहेत. सुबोध हा पाणीपुरवठा विभागात समन्वयक आहे.
या प्रकरणातील नागरिकाने पहाडसिंगपुरा येथील गुंठेवारी वसाहतीमध्ये चार महिन्यांपूर्वी घर बांधले. त्यांनी औरंगाबाद वॉटर युटिलिटी कंपनीकडे नळ कनेक्शन मिळावे, यासाठी अर्ज दाखल केलेला आहे. औरंगाबाद वॉटर युटिलिटी कंपनीचा अभियंता आणि कर्मचारी नागरिकाच्या घरी पाहणी करून गेले. त्यावेळी त्यांनी तुम्ही नळ कनेक्शन घेऊन टाका, दोन-चार दिवसांत तुमची फाईल मंजूर होईल असे त्यांना सांगितले. त्यानंतर सदर नागरिकाने एका प्लंबरच्या मदतीने नळ जोडणी क रून घेतली.
ही बाब सुबोधला समजल्यानंतर त्याने तुम्ही अनधिकृत नळ कनेक्शन घेतले असल्याने तुमच्याविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करतो, अशी धमकी दिली. हा गुन्हा दाखल न करण्यासाठी त्याने दहा हजार रुपये लाचेची मागणी केली. लाचेची रक्कम घेऊन सोमवारी मनपात येण्याचे सांगितले.
सदर नागरिकाच्या भावाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. दरम्यान, नागरिकाशी तडजोड करून सोमवारी सकाळी सुबोधने त्याच्याकडून आठ हजार रुपये लाच घेताना त्यास रंगेहाथ पकडण्यात आले.