खरेदीला आठ दिवसांची मुदतवाढ
By Admin | Updated: April 15, 2017 00:13 IST2017-04-15T00:08:47+5:302017-04-15T00:13:14+5:30
बीड : शेतकऱ्यांकडील शिल्लक तुरीचा विचार करून तूर खरेदी केंद्रांना आठ दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे

खरेदीला आठ दिवसांची मुदतवाढ
बीड : शेतकऱ्यांकडील शिल्लक तुरीचा विचार करून तूर खरेदी केंद्रांना आठ दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. यासंबंधीचे पत्र पणन मंत्र्यांच्या वतीने येथील जिल्हा मार्केटिंग अधिकारी कार्यालयाला देण्यात आले आहे. त्यामुळे काही प्रमाणात का होईना; शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
नाफेडच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या तूर खरेदी केंद्रांची मुदत १५ मार्चपर्यंत ठरवून देण्यात आली होती. मात्र, तुरीचे उत्पादन अधिक प्रमाणात वाढल्याने प्रशासनाला दोन वेळा मुदतवाढ द्यावी लागली आहे. यावेळी केवळ आठ दिवसांची मुदतवाढ देण्यात आली असून, खरेदी केंद्रांवर शेतकऱ्यांची गर्दी होणार आहे. जिल्ह्यात अद्यापही १ लाख क्विंटल तूर शिल्लक आहे. त्यामुळे मुदतवाढीचे साकडे येथील कृउबाच्या सभापती तसेच लोकप्रतिनिधींनी नाफेडकडे घातले होते. त्यानुसार ही मुदतवाढ झाली आहे. मुदतवाढीचा फायदा घेत शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी लावणार असल्याचे जिल्हा मार्केटिंग अधिकारी एस. के. पांडव यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
दरम्यान, केवळ आठ दिवसांची मुदतवाढ मिळाल्याने एक लाख क्विंटल तूर खरेदी केंद्रावर स्वीकारणे शक्य होईल का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे. (प्रतिनिधी)