शहरातील आठ बुकी फरार

By Admin | Updated: May 19, 2015 00:53 IST2015-05-19T00:36:53+5:302015-05-19T00:53:14+5:30

औरंगाबाद : आयपीएल टी-२० क्रिकेट स्पर्धेवर सट्टा खेळविणाऱ्या सात बुकींना आतापर्यंत अटक झाली आहे. उर्वरित २२ बुकींपैकी आठ जण शहरातील असून,

Eight bookies absconded in city | शहरातील आठ बुकी फरार

शहरातील आठ बुकी फरार


औरंगाबाद : आयपीएल टी-२० क्रिकेट स्पर्धेवर सट्टा खेळविणाऱ्या सात बुकींना आतापर्यंत अटक झाली आहे. उर्वरित २२ बुकींपैकी आठ जण शहरातील असून, ते फरार झाले आहेत. फरार असलेल्या बुकींभोवती ठोस पुरावे गोळा करण्यास सायबर क्राईम सेलने सुरुवात केली आहे. शिवाय दिल्ली येथील एका बुकीच्या मुसक्या आवळण्याकरिता सायबर क्राईम सेलचे निरीक्षक गौतम पातारे दिल्लीला रवाना झाले आहेत.
उस्मानपुरा भागातील राम गोविंद अपार्टमेंटमधील तिसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या नरेश धर्माजी पोतलवाड याने स्वत:च्या घरात मिनी टेलिफोन एक्स्चेंज उभारून आयपीएल क्रिकेट स्पर्धेवर सट्टा खेळविणाऱ्या बुकींना लाईन्स उपलब्ध केल्या होत्या. पोलिसांनी छापा मारला तेव्हा तब्बल २८ बुकी आॅनलाईन होते. यात एक जण दिल्लीतील, एक कर्नाटक राज्यातील बीदर येथील, तर आणखी ८ जण शहरातील आहेत. पोलिसांनी शनिवारी रात्री स्वप्नील मणियार यास अटक केली. अटकेतील आरोपींची पोलीस कोठडी मंगळवारी संपत आहे. या प्रकरणाशी संबंधित शहरातील आणखी आठ जण फरार झाले आहेत.
औरंगाबादेतील बुकी हे नरेश पोतलवाडच्या टेलिफोन एक्स्चेंजच्या माध्यमातून दिल्लीतील बुकींशी संपर्कात होते. त्यामुळे येथील बुकी आणि दिल्लीतील बुकींमध्ये आतापर्यंत कशा प्रकारचे व्यवहार झाले आहेत, तसेच त्यांचा खेळाडूंसोबत काही संबंध आहे का, याबाबतचा सखोल तपास करण्यात येणार आहे. त्याकरिता पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी सायबर क्राईम सेलचे निरीक्षक गौतम पातारे यांना सोमवारी दिल्लीला पाठविले आहे. दिल्लीतील बुकी पोलिसांच्या हाती लागल्यानंतर या प्रकरणाचे खरे स्वरूप समोर येणार आहे.

Web Title: Eight bookies absconded in city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.