ईद उत्साहात

By Admin | Updated: June 27, 2017 00:52 IST2017-06-27T00:51:31+5:302017-06-27T00:52:24+5:30

जालना : महिनाभर रोजे करून अल्लाहची इबादत केल्यानंतर जालना शहर व जिल्ह्यात मुस्लिम बांधवांनी सोमवारी ईद उल फितर पारंपरिक पद्धतीने उत्साहात साजरी केली

Eid excitement | ईद उत्साहात

ईद उत्साहात

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : महिनाभर रोजे करून अल्लाहची इबादत केल्यानंतर जालना शहर व जिल्ह्यात मुस्लिम बांधवांनी सोमवारी ईद उल फितर पारंपरिक पद्धतीने उत्साहात साजरी केली. जुना जालन्यातील ईदगाह मैदानावर सकाळी हजारोंच्या संख्येने उपस्थित मुस्लिम बांधवांनी सामूहिक नमाज पठण केले. यानंतर गळाभेट घेत एकमेकांना रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या.
जिल्ह्यात सर्वत्र रमजान ईदचा उत्साह दिसून आला. शहरातील विविध मशिदींमध्ये सकाळी नऊ ते साडेदहा या वेळेत नमाज पठण करण्यात आली. ईदगाह मैदानावर झालेल्या मुख्य नमाज पठणास हजारो मुस्लिम बांधव नवीन पोशाख परिधान करून उपस्थित होते. ईदगाह मैदानावरील जागा अपुरी पडल्यामुळे नमाज पठणासाठी मुख्य रस्त्यावरील पंचायत समिती कार्यालयापर्यंत गर्दी दिसून आली. मौलाना गुफरान यांनी नमाज पठण केले. या वेळी पोलीस अधीक्षक रामनाथ पोकळे, प्रभारी जिल्हाधिकारी बी.पी. खपले, अप्पर पोलीस अधीक्षक लता फड, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन बारी, माजी आ. कैलास गोरंट्याल, माजी आ. अरविंद चव्हाण, उपनगराध्यक्ष राजेश राऊत, मुख्याधिकारी संतोष खांडेकर, तहसीलदार बिपीन पाटील, पोलीस निरीक्षक बालासाहेब पवार, नायब तहसीलदार संदीप ढाकणे, आॅल इंडिया मुस्लिम ओबीसी अध्यक्ष शब्बीर अन्सारी, डॉ. मोहंमद बद्रोद्दीन, काँग्रेसचे शहराध्यक्ष अब्दुल हफिज, शहाआलम खान, शेख महेमूद, मोहन इंगळे, गणेश सुपारकर, तय्यब देशमुख आदींची उपस्थिती होती. उपस्थितांनी मुस्लिम बांधवांना गुलाब पुष्प देऊन ईदच्या शुभेच्छा दिल्या. या वेळी एकबाल पाशा यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सर्वधर्म समभाव व शांतीचा संदेश दिला.
हिंदू बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा देत सामाजिक एकतेचा संदेश दिला. शहरातील सदर बाजार ईदगाह व गांधीनगर ईदगहामध्ये सामूहिक नमाज अदा करण्यात आली. नमाज पठाण करून आल्यानंतर मुस्लिम बांधवांसाठी अनेक सेवाभावी संस्थांच्या वतीने अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती. ईदगाह परिसरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. वाहनतळाचीही विशेष व्यवस्था करण्यात आली होती.

Web Title: Eid excitement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.