विद्यापीठातील विचारांचे प्रदूषण संपविण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2018 12:06 AM2018-06-11T00:06:29+5:302018-06-11T00:08:55+5:30

विद्यापीठाचा परिसर प्लास्टिकमुक्त करण्याला कार्यकाळाच्या पहिल्या दिवसापासूनच प्राध्यान्य दिले. आगामी काळात विद्यापीठ परिसरातील विचारांसंदर्भातील प्रदूषण संपविण्याचा प्रयत्न करणार आहे. यासाठी प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देत आहोत. आपण कशासाठी आहोत, आपल्या देशाचे, राज्याचे आणि शेतकऱ्यांचे हित कशात आहेत, याची जाणीव करून देणार असल्याची प्रबळ इच्छाशक्ती परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे नवनियुक्त कुलगुरू डॉ. अशोक ढवण यांनी व्यक्त केली.

Efforts to eliminate pollution in the university | विद्यापीठातील विचारांचे प्रदूषण संपविण्याचा प्रयत्न

विद्यापीठातील विचारांचे प्रदूषण संपविण्याचा प्रयत्न

googlenewsNext
ठळक मुद्देवसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूंचा मुक्त संवाद

विद्यापीठाचा परिसर प्लास्टिकमुक्त करण्याला कार्यकाळाच्या पहिल्या दिवसापासूनच प्राध्यान्य दिले. आगामी काळात विद्यापीठ परिसरातील विचारांसंदर्भातील प्रदूषण संपविण्याचा प्रयत्न करणार आहे. यासाठी प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देत आहोत. आपण कशासाठी आहोत, आपल्या देशाचे, राज्याचे आणि शेतकऱ्यांचे हित कशात आहेत, याची जाणीव करून देणार असल्याची प्रबळ इच्छाशक्ती परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे नवनियुक्त कुलगुरू डॉ. अशोक ढवण यांनी व्यक्त केली.
विद्यापीठाच्या कुलगुरूपदी ज्येष्ठ मृदाशास्त्रज्ञ डॉ. अशोक ढवण यांची नुकतीच राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी नियुक्ती केली. ‘लोकमत’च्या औरंगाबादेतील कार्यालयाला सदिच्छा भेट देऊन संपादकीय विभागातील सहकाºयांशी त्यांनी साधलेला मुक्तसंवाद असा.
कुलगुरूपदाची निवड ही सुखद आणि आनंददायी वार्ता होती. ३३ वर्षे केलेल्या सेवेची फलनिष्पत्ती होती. प्रत्येकाला आपण कार्य केलेल्या क्षेत्रातील सर्वोच्चपद मिळविण्याची इच्छा असतेच. याला मीही अपवाद नाही. विद्यार्थी जीवनापासून कृषी विद्यापीठात अनेकांना रोल मॉडेल म्हणून पाहिले आहे. त्यातील बहुतांश जणांना कुलगुरू होण्याची संधी मिळाली. अध्यापनाचे मला पॅशन होते व आहे. १९८५ ते ९५ या काळातील दहा वर्षांतील अध्यापन प्रचंड अनंददायी होते. विद्यार्थ्यांच्या जीवनात होणारे बदल टिपताना आनंद होत असे. एका प्राध्यापकाला हा आनंद समाधानकारक असतो.
शेतकरी व कृषी
उद्योजक घडविण्यात कमी
परभणीच्या कृषी विद्यापीठात अध्यापनाचे कार्य करताना अनेक विद्यार्थी घडवले. असंख्य विद्यार्थी प्रशासनात, खाजगी कंपन्यांमध्ये मोठ्या पदावर कार्यरत आहेत. असे असतानाही विद्यार्थ्यांना शेतकरी, कृषी उद्योजक बनविण्यात आम्हाला फार यश आलेले नाही. यात आम्ही कमी पडलेलो आहोत. मात्र, आता काळानुरूप बदल करीत आहोत. सरकारी क्षेत्रातील रोजगार कमी होत आहे. खाजगी उद्योग, सेवा क्षेत्रात प्रचंड प्रमाणात संधी निर्माण झाल्या आहेत. त्या संधी आमच्या विद्यार्थ्यांना उपलब्ध झाल्या पाहिजेत. यासाठी पावले उचलत आहोत.
तंत्रज्ञान निर्मितीचा प्राधान्यक्रम बदलावा लागेल
भारताचा विकास शेतीशिवाय अशक्य आहे. मागील दहा वर्षांत तंत्रज्ञान कालबाह्य होण्याचा वेग प्रचंड वाढला आहे. एक संशोधन केले की, तात्काळ पुढची आवृत्ती येते. एका रोगावर उपाय शोधला की दुसरा रोग आक्राळविक्राळ रूप घेऊन समोर येत आहे. हवामान वेगाने बदलत आहे. पावसाच्या दिवसांत बदलल झाले, होत आहेत. यामुळे तंत्रज्ञान निर्मितीचा प्राधान्यक्रम बदलणे आवश्यक आहे. त्यानुसारच संशोधनाला दिशा देण्यात येईल.
शेतकºयांची पिळवणूक
स्वातंत्र्यानंतर देशाच्या पुढे अन्नधान्यातील स्वावलंबन ही प्रमुख समस्या होती. या समस्येवर आपण पूर्णपणे मात केली. अन्नधान्याच्या निर्मितीत जगात भारताचा अनेक बाबतींत दुसरा-तिसरा क्रमांक लागतो. या बदलामध्ये कृषी विद्यापीठांचा मोठा वाटा आहे. अन्नधान्याचे उत्पादन प्रचंड वाढले. मात्र, त्या तुलनेत भावाचा प्रश्नही गंभीर आहे. शेतकºयांचे उत्पादन वाढले. मात्र, त्यांचे उत्पन्न वाढले नाही. बाजारपेठीय व्यवस्थेतील दोषात शेतकरी फसला आहे. यासाठी सर्वच यंत्रणा जबाबदार आहे. रासायनिक खतांवर बंदी अशक्यच
रासायनिक खतांवर बंदी घालण्याचे बोलले जाते. मात्र, रासायनिक आणि सेंद्रिय खते ही एकमेकास परस्पर पूरक आहेत. योग्य त्या प्रमाणात मात्रा दिल्यास कोणताही अपाय होत नाही. तसेच सरसकट सेंद्रिय शेती शक्य नाही. यामुळे रासायनिक खतांवरील बंदी हे शुद्ध बालिशपणाचे लक्षण आहे.
विद्यापीठासमोर मोठी आव्हाने
कृषी विद्यापीठासमोर सर्वात मोठी समस्या मनुष्यबळाचा तुटवडा ही आहे. विद्यापीठाची स्थापना १९७२ साली झाली. तेव्हा पदे भरली होती. ती आता मोठ्या प्रमाणात रिक्त होत आहेत. त्या तुलनेत नव्याने पदभरती होत नाही. याशिवाय आहे त्या प्राध्यापकांची कार्यक्षमता वाढविणे, विद्यार्थ्यांना प्रयोगशीलतेचे प्रशिक्षण देणे, उद्योगांना विद्यापीठाशी जोडणे, त्यांच्यासोबत विविध विषयांवर करार करणे, प्राध्यापकांना प्रशिक्षण देणे, अशी विविध कामे करावी लागणार आहेत. यातून विद्यापीठात सकारात्मक बदल होईल.
स्टंटबाजी नकोच
कुलगुरूपदी निवड झाल्यानंतर विद्यार्थ्यांना अध्यापनाचे धडे देण्याचे अनेक जण प्रयत्न करतात. मात्र, माझ्याकडून असले प्रसिद्धीचे स्टंट होणार नाहीत. विद्यार्थ्यांना अध्यापनाचे धडे देण्याएवढा वेळ कुलगुरूंना निश्चित मिळू शकत नाही. जेव्हा वेळ मिळेल तेव्हा विद्यापीठातील प्राध्यापकांना मार्गदर्शन करून त्यांच्या क्षमता मात्र नक्की वाढविण्यासाठी प्रयत्न करता येईल.
प्राध्यापकांनी शेतकºयांचे जीवनमान उंचवावे
आज प्राध्यापकांवर मोठी जबाबदारी आहे. पूर्वी प्राध्यापकांना खूप कमी पगार होते. तेव्हा प्राध्यापक कायम ऋणको असायचे. मात्र पाचवा, सहावा आणि सातव्या वेतन आयोगाने प्राध्यापकांना सन्मानजनक वेतन व जीवन दिले आहे. कोणत्याही प्रकारची आर्थिक चणचण नाही. चांगले घर, मुलांची शिक्षणे परदेशात होतील. इतकी सुबत्ता प्राध्यापकांकडे आली आहे. प्राध्यापक ऋणको नव्हे तर धनको बनला आहे.
ही सुबत्ता शेतकºयांच्या जीवनात आपण काहीतरी सकारात्मक बदल करण्यासाठी वापरावी, असे मी प्राध्यापकांना आवाहन करतो. प्राध्यापकांना याचा विचार करण्याची वेळ आता आली आहे. शेतकºयांचे जीवनमान उंचावण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे. याचा विचार प्राध्यापकांनी करून आपली शक्ती सत्कारणी लावली पाहिजे. सेवानिवृत्त झाल्यानंतरही प्राध्यापकाला लाखभर रुपये पेन्शन मिळते. हा समाजाचा पैसा आहे. तेव्हा जोपर्यंत कार्य करता येईल. तोपर्यंत प्राध्यापकांना काम करावे लागेल. कारण प्राध्यापक हा समाजाचे सर्वांधिक देणे लागतो, हा विचार कायम मनात ठेवाला पाहिजे.

Web Title: Efforts to eliminate pollution in the university

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.