शिक्षणाधिकाऱ्यांना घेतले फैलावर !

By Admin | Updated: November 10, 2014 23:58 IST2014-11-10T23:28:14+5:302014-11-10T23:58:48+5:30

बीड : अतिरिक्त शिक्षकाला संस्थेने रुजू करुन न घेतल्याने शिक्षणाधिकारी (मा़) लता सानप यांनी येथील चंपावती माध्यमिक शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी

Education officials took the spread! | शिक्षणाधिकाऱ्यांना घेतले फैलावर !

शिक्षणाधिकाऱ्यांना घेतले फैलावर !


बीड : अतिरिक्त शिक्षकाला संस्थेने रुजू करुन न घेतल्याने शिक्षणाधिकारी (मा़) लता सानप यांनी येथील चंपावती माध्यमिक शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी अशा ६५ जणांचे तीन महिन्यांचे वेतन रोखले़ त्यामुळे ‘चंपावती’च्या शिक्षकांनी सोमवारी जि़प़ अध्यक्ष विजयसिंह पंडित यांच्याकडे धाव घेतली़ पंडित यांनी शिक्षणाधिकारी लता सानप यांना धारेवर धरत तात्काळ वेतन द्या, असे आदेश दिले़ शिक्षकांना नाहक वेठीस धराल तर ते कदापि सहन करुन घेणार नाही, असा दमही त्यांनी भरला़
अतिरिक्त ठरलेले शिक्षक सचिन खाडे यांना येथील चंपावती शाळेत रुजू करुन घ्यावे, असे आदेश माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी लता सानप यांनी चार महिन्यांपूर्वी काढले होते़ मात्र, चंपावती संस्था खाडे यांना रुजू करुन घ्यायला तयार नव्हती़ त्यामुळे सप्टेंबर २०१४ मध्ये दस्तूरखुद्द शिक्षणाधिकारी (मा़) लता सानप यांच्यासह शिक्षण विस्तार अधिकारी धनंजय शिंदे यांनी चंपावती शाळेत जाऊन स्वत:च शिक्षक खाडे यांना रुजू करुन घेण्याची प्रक्रिया सुरु केली़
यावेळी संस्था पदाधिकाऱ्यांकडून धनंजय शिंदे यांना धक्काबुक्कीचा प्रकार घडला होता़ हे प्रकरण चांगलेच गाजले होते़ त्यानंतर शिक्षणाधिकारी सानप यांनी संस्थेचा राग शिक्षकांवर काढत ४९ शिक्षक, १६ कर्मचारी अशा ६५ जणांचे सप्टेंबर २०१४ पासूनचे वेतन रोखले़ त्यामुळे शिक्षकांना ऐन दसरा, दिवाळीत उधारी, उसणवारी करावी लागली़
सोमवारपासून शाळा सुरु झाल्या़ त्यामुळे उपमुख्याध्यापक बी़ एऩ गिरी यांच्या नेतृत्वाखाली डी़ टी़ नागरे, जे़ बी़ कुलकर्णी, आऱ एम़ देशपांडे, संजय चौसाळकर, प्रकाश मानूरकर, राजेंद्र देवकर, सुरेखा कुलकर्णी, सुलभा केंडे, नयना कुलकर्णी आदींनी जि़प़ अध्यक्ष विजयसिंह पंडित यांची भेट घेतली़ शिक्षणाधिकारी सानप या आधीच बैठकीच्या निमित्ताने तेथे आलेल्या होत्या़
शिक्षकांनी कैफियत मांडल्यावर अध्यक्ष पंडित यांनी शिक्षणाधिकारी सानप यांना ‘तुम्ही कुठल्या नियमात शिक्षकांचे वेतन रोखले?’ असा सवाल केला़ ‘तुम्ही द्वेषातून वेतने रोखले आहे़ संस्थाचालक, मुख्याध्यापक सहकार्य करत नसतील तर कारवाई त्यांच्यावर करा;पण शिक्षकांचे वेतन रोखू नका, अशी तंबी पंडित यांनी दिली़ आजच्या आज वेतन द्या, असे फर्मान त्यांनी सोडले़
सानप यांची भंबेरी!
अध्यक्ष पंडित यांनी शिक्षकांसमोरच शिक्षणाधिकारी सानप यांची खरडपट्टी काढली़ खुलासा करताना सानप यांची भंबेरी उडाली़ संस्था, मुख्याध्यापक, शिक्षक सारे एकच आहेत़ संस्था सहकार्य करीत नाही, त्यामुळे शिक्षकांचे वेतन रोखले तर संस्था ताळ्यावर येईल म्हणून वेतन रोखल्याचे त्यांनी सांगितले़ त्यामुळे त्यांचे हसू झाले़ ‘आम्ही शाळेत गेल्यावर तीन तास कोणी फिरकले नाही़ त्यामुळे शिक्षणाधिकाऱ्याशी असे वागणे योग्य आहे का?’ असा प्रतिसवाल त्यांनी केला़ (प्रतिनिधी)
जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विजयसिंह पंडित यांचे प्राथमिक शिक्षण चंपावती विद्यालयात झालेले आहे़ याच शाळेतील शिक्षक थकित वेतनाचे गाऱ्हाणे घेऊन अध्यक्ष पंडित यांच्याकडे आले़ ‘खरे तर मीच संपर्क करायला हवा होता़़़’ असे म्हणत त्यांनी शिक्षकांचे म्हणणे ऐकून घेतले़ त्यानंतर शिक्षकांच्या वेतनाचा प्रश्न सोडवला़ यावेळी शिक्षकांनी टाळ्या वाजवून त्यांचे कौतूक केले़ शिष्यच गुरुंसाठी धावून आला़़़ अशा प्रतिक्रिया यावेळी व्यक्त झाल्या़

Web Title: Education officials took the spread!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.