उपशिक्षणाधिकारीच बनले ‘सीईओ‘
By Admin | Updated: May 22, 2014 00:14 IST2014-05-21T23:35:41+5:302014-05-22T00:14:53+5:30
कळंब : जि प. मधील एका कनिष्ठ सहाय्यक व उपशिक्षणाधिकारी (प्रा) यांनी मुख्य कार्यकारी अधिकार्यांचे अधिकार वापरून आंदोरा येथील शिक्षकास नियुक्ती आदेश निर्गमित केल्याचे समोर आले आहे.

उपशिक्षणाधिकारीच बनले ‘सीईओ‘
कळंब : अनधिकृतरीत्या गैरहजर राहणार्या जिल्हा परिषद अस्थापनेवरील कर्मचार्यास उपस्थित करून घेण्यासंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी यांना अधिकार असताना जि प. मधील एका कनिष्ठ सहाय्यक व उपशिक्षणाधिकारी (प्रा) यांनी मुख्य कार्यकारी अधिकार्यांचे अधिकार वापरून आंदोरा येथील शिक्षकास नियुक्ती आदेश निर्गमित केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी रास्त मार्गाने संचिका सादर न केल्याचे व मुख्य कार्यकारी अधिकार्यांचे अधिकार वापरल्याचे निष्पन्न झाल्याने या दोघांवरही कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे. दिनेश हरीभाऊ शेरखाने हे आंदोरा (ता. कळंब) येथील पारधीवस्ती जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सहशिक्षक म्हणून कार्यरत होते. आंदोरा केंद्राचे प्रमुख पी. आर. गामोड व साधन व्यक्ती एस. एल. कुंभार यांनी पारधी वस्ती शाळेला अचानक भेट दिली असता शेरखाने हे अनधिकृतरित्या गैरहजर असल्याचे आढळून आले होते. यावरून पी. आर. गामोड यांनी १९ सप्टेंबर २०१३ रोजी तर साधन व्यक्ती एस. एल. कुंभार यांनी २० नोव्हेंबर २०१३ रोजी कळंब येथील गटशिक्षणाधिकार्यांना आपला अहवाल सादर केला होता. यावरून कळंबच्या गटशिक्षणाधिकारी यांनी केंद्रप्रमुख गामोड यांच्या अहवालावरून २५ सप्टेंब २०१३ रोजी सहशिक्षक डी. एच. शेरखाने यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. यावर शेरखाने यांनी वैद्यकीय कारण दाखवून उपस्थित नसल्याचे कळवून ११ आॅक्टोबर २०१३ रोजी प्राथमिक शिक्षणाधिकारी यांना उपस्थित करून घेण्याबाबत विनंती अर्ज केला होता. अनधिकृत गैैरहजर शिक्षकास उपस्थित करून घेण्याबाबतची संचिका प्राथमिक शिक्षणाधिकार्यांमार्फत मुख्य कार्यकारी अधिकार्यांना सादर करणे आवश्यक होते. परंतु शिक्षण विभागातील कनिष्ठ सहाय्यक एस. आर. पवार यांनी सदर संचिका उपशिक्षणाधिकारी नंदकुमार जगदाळे यांच्याकडे सादर केली. तसेच उपशिक्षणाधिकारी जगदाळे यांनीही अधिकार नसताना शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांच्या नावासमोर स्वाक्षरी करून संबंधित शिक्षक शेरखाने यांना रुजू करून घेण्याबाबतचे ओदश गटशिक्षणाधिकारी कळंब यांना निर्गमित केले. याबाबत सामाजिक कार्यकर्ते कचरू टकले यांनी तक्रार केल्यानंतर ही बाब उजेडात आली. याप्रकरणी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत हजारे यांनी प्राथमिक शिक्षणाधिकारी ए. एस. उकिरडे, सहशिक्षक डी. एच. शेरखाने व कनिष्ठ सहाय्यक एस. आर. पवार यांच्या उपस्थितीत ५ मे २०१४ रोजी सुनावणी घेतली. यावेळी तत्कालीन शिक्षणाधिकारी यांनी सदर संचिका आपल्याकडे आलीच नव्हती, असा लेखी खुलासा दिल्याने उपरोक्त दोघांवरही मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आदेशाप्रमाणे संचिका प्रस्तावित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. (वार्ताहर) असे ठरले दोषी कनिष्ठ सहाय्यक एस. आर. पवार यांनी सदर संचिका मुख्य कार्यकारी अधिकार्यांकडे न पाठविता उप शिक्षणाधिकारी स्तरावर निकाली काढल्यामुळे त्यांना दोषी ठरविण्यात आले. तसेच उपशिक्षणाधिकारी जगदाळे यांनी मुख्य कार्यकारी अधिकार्यांचा अधिकार वापरून शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांच्या पदनामासमोर स्वाक्षरी केली, म्हणून त्यांना दोषी ठरविण्यात आले.