शिक्षण, आरोग्यसाठी छुपी लढाई
By Admin | Updated: April 6, 2017 23:16 IST2017-04-06T23:16:13+5:302017-04-06T23:16:36+5:30
बीडराष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यातून जिल्हा परिषद खेचून आणल्यानंतर युतीमध्ये आता ‘वजनदार’ खात्यावरुन जोरदार चुरस निर्माण झाली आहे

शिक्षण, आरोग्यसाठी छुपी लढाई
संजय तिपाले बीड
राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यातून जिल्हा परिषद खेचून आणल्यानंतर युतीमध्ये आता ‘वजनदार’ खात्यावरुन जोरदार चुरस निर्माण झाली आहे. शिक्षण व आरोग्य खात्यावर उपाध्यक्षा जयश्री राजेंद्र मस्के व सभापती राजेसाहेब देशमुख या दोघांनीही दावा केला आहे. उपाध्यक्षांनी तत्कालीन शिक्षण व आरोग्य सभापतींचे दालन मिळवून हे खाते आपल्याकडेच येईल, असे संकेत दिले आहेत. राजेसाहेब देशमुख यांनीही याच खात्यासाठी ‘फिल्डींग’ लावली आहे. शुक्रवारी नवे कारभारी सत्तारुढ होत आहेत. तत्पूर्वीच सत्ताधाऱ्यांत छुप्या लढाईची ठिणगी पडली आहे.
भाजपकडे अवघे २० सदस्य असताना पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी शिवसंग्राम, शिवसेना व काँग्रेस- राकॉचे अनुक्रमे १ व ५ बंडखोर सदस्यांचा पाठिंबा मिळवून राष्ट्रवादीचा सत्ता अबाधित ठेवण्याचा डाव विस्कटून लावला. अध्यक्ष- उपाध्यक्ष व सभापती निवडीत सर्वांना समसमान वाटाही देण्यात आला. माजी मंत्री सुरेश धस यांनी ५ सदस्य भाजपच्या तंबूत पाठवूनही सभापतीपद नाकारुन मनाचा मोठेपणा दाखवून दिला. भाजपच्या शोभा दरेकर यांची महिला व बालकल्याण व संतोष हंगे यांची समाजकल्याण सभापतीपदी वर्णी लागली.
शिवसेनेचे युद्धजित पंडित व काँगे्रसचे राजेसाहेब देशमुख यानाही सभापतीपद मिळाले. उपाध्यक्षांकडे कोणत्याही एका समितीची धुरा सोपविलीच जाते. आता शिक्षण व आरोग्य, अर्थ व बांधकाम, कृषी व पशुसंवर्धन खात्यांचे वाटप बाकी आहे. इथपर्यंत सारे ठीक होते; परंतु शिक्षण व आरोग्य समितीची धुरा कोणाकडे द्यायची? यावरुन मात्र सत्ताधाऱ्यांत एकमत व्हायला तयार नाही. अडीच वर्षांपूर्वी युती व आघाडीकडे समसमान संख्याबळ असल्याने चिठ्ठीवर निवडी झाल्या होत्या. यात काँग्रेसच्या आशा दौंड यांची उपाध्यक्षपदी निवड झाली; परंतु परंपरेने उपाध्यक्षांकडे असलेले अर्थ व बांधकाम खाते काढून त्यांना कृषी व पशुसंवर्धन खाते देण्यात आले. अर्थ व बांधकाम समिती युद्धजित पंडित यांना निश्चित झालेली आहे. सभापती निवडीनंतर खातेवाटप झालेले नसताना बॅनर, पोस्टर्सवर त्यांच्या नावापुढे अर्थ व बांधकाम खात्याचा आवर्जून उल्लेख आढळून आला. कृषी व पशुसंवर्धन, शिक्षण व आरोग्य या दोन समित्यांचे कारभारी कोण? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. शुक्रवारी नूतन पदाधिकारी सत्तारुढ होणार आहेत. या सोहळ्यास खा. डॉ. प्रीतम मुंडे यांचीही उपस्थिती राहणार आहे. या पार्श्वभूमीवर जुन्या पदाधिकाऱ्यांचे नामफलक हटविण्यात आले असून तत्कालीन शिक्षण सभापती बजरंग सोनवणे यांच्या दालनावर उपाध्यक्षा मस्के यांचे नाव लागले आहे. अध्यक्षांच्या दालनाला लागूनच सोनवणे यांचे दालन होते. त्यामुळे ते सोयीचे असल्याचे वरकरणी कारण दिले असले तरी हे दालन मिळवून मस्के यांनी शिक्षण व आरोग्य खात्यासाठीचा दावा बळकट केला.