ठिबकाच्या क्रांतीमुळे आर्थिक समृद्धी
By Admin | Updated: June 10, 2014 00:17 IST2014-06-09T23:49:07+5:302014-06-10T00:17:07+5:30
विश्वास साळुंके, वारंगाफाटा वारंगाफाटा : कमीत कमी वेळेत, कमीत कमी खर्चात, किमान मेहनतीद्वारे शेतीतून अधिकाधिक उत्पन्न मिळविण्याची शेतकऱ्यांकडून धडपड व स्पर्धा वाढली आहे.
ठिबकाच्या क्रांतीमुळे आर्थिक समृद्धी
विश्वास साळुंके, वारंगाफाटा
वारंगाफाटा : कमीत कमी वेळेत, कमीत कमी खर्चात, किमान मेहनतीद्वारे शेतीतून अधिकाधिक उत्पन्न मिळविण्याची शेतकऱ्यांकडून धडपड व स्पर्धा वाढली आहे. म्हणूनच ठिबक सिंचनाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढल्याने यंदा हळद व कापूस लागवडीची लगबग दिसून येत आहे. गतवर्षी वारंगाफाटा परिसरातील अनेक उत्पादकांनी ठिबक सिंचनाचा वापर करून विक्रमी उत्पादन काढले. परिणामी परिसरात आर्थिक समृद्धी आल्याने ठिबक सिंचनाची क्रांती घडून येत आहे.
आधुनिक शेतीकडे शेतकरी वळले आहेत. प्रामुख्याने ठिबक सिंचनाचा अधिक वापर करण्यावर शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. एकीकडे ठिबक सिंचन संच खरेदीचा खर्च तेवढा लागत आहे. दुसरीकडे मात्र निंदणी, खत टाकणी व इतर मशागतीची कामे ठिबक सिंचनामुळे सुलभ, कमी वेळेची आणि अल्पखर्ची ठरत आहेत. कारण कृषीपंपाला दिवसाकाठी केवळ ८ तास वीज मिळत आहे. या वेळेत संपूर्ण क्षेत्र भिजणे कठीण असल्याने ठिबक सिंचन उपयोगी पडत आहे. ठिबकामुळे एका तासात एक ते दोन एकर जमिनीवरील पिके पाण्याच्या आवश्यकतेनुसार समान पाणी देऊन भिजत आहेत. मोकाट पाणी दिले नसल्याने तणाची उगवण कमी झाल्याने पिकांच्या ंिनंदणीसाठी लागणारा खर्च मोठ्या प्रमाणात वाचला जातो.
शासनाने रासायनिक खतांवरील सबसिडी काढून घेतल्याने रासायनिक खत खरेदी करणे शेतकऱ्यांना अवघड झाले आहे. उलट बाजारात पाण्यात विरघळणारी खते उपलब्ध झाली आहेत. ही खते ठिबकाद्वारे पिकांना आवश्यकतेनुसार व कमी वेळात देता येतात. त्यामुळे खतांसाठी लागणारा खर्च व वेळेची बचत होते. पारंपारिक पद्धतीने रासायनिक खत पिकांना लागू होण्यास फार दिवस लागतात; मात्र पाण्यातून दिलेली खते केवळ ४८ तासांत पिकांला लागू होतात. शिवाय खर्च व मेहनतीमध्ये मोठ्या प्रमाणावर बचत होते. सर्व बाबींचा विचार करून कळमनुरी तालुक्यातील वारंगाफाटा परिसरात ठिबक सिंचनाचा वापर वाढला आहे. त्यातून पिकांचे उत्पादन दुप्पटीनेच वाढल्याने उत्पादकांना लाखो रूपयांचा माल झाला. म्हणून कळमनुरी तालुक्यातील वारंगाफाटा परिसरात आर्थिक सुबत्ता आल्याने ठिबक क्रांती घडत आहे.
दहा वर्षांपासून ठिबक सिंचनाद्वारे दरवर्षी कापूस, हळद, केळी आदी महत्वाची पिके घेत आहे. दरवर्षी ४० ते ४५ क्विंटल हळदीचे उत्पन्न मिळते. यापूर्वी ठिबक सिंचन नसताना केवळ २५ ते ३० क्विंटल एवढेच हळदीचे उत्पादन होत होते. तसेच दरवर्षी किमान २५ ते २७ क्विंटल कापूस एका एकरात होत आहे. प्रतिवर्षी सर्वच पिकांचे विक्रमी उत्पादन वाढल्याने ठिबक ही काळाची गरज बनली आहे.
- नामदेवराव साळुंके,
वारंगाफाटा